श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते, अयातुल्ला अली खामेनी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी तेहरानला जाणार आहेत. इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या कार्यालयातील आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे संचालक मोहसेन कुम्मी यांनी मेहबूबा यांना भारताच्या विशेष अतिथी म्हणून अंत्यविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी औपचारिक निमंत्रण दिले आहे.पीडीपी अध्यक्षा म्हणाल्या, “इराणकडून हे निमंत्रण मिळणे हा एक मोठा सन्मान आणि आयुष्यात एकदाच मिळणारी संधी आहे. मी सर्वोच्च नेत्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी तिथे प्रवास करणार आहे.” निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे, “ग्रँड अयातुल्ला सय्यद अली खामेनी यांची २८ फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आली आणि इस्लामिक प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय शोक कालावधी व नियमांनुसार, ३ ते ६ जुलै दरम्यान तेहरानमध्ये शासकीय अंत्यविधी सोहळा आयोजित केला जाईल.”
मेहबूबा मुफ्ती यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, “इराण आणि भारत प्रजासत्ताक यांच्यात असलेले सखोल ऐतिहासिक आणि सामरिक संबंध लक्षात घेता, भारतीय राष्ट्राच्या एक प्रतिष्ठित अतिथी म्हणून तुम्हाला या सोहळ्यासाठी आमंत्रित करणे हा माझा परम सन्मान आहे. तुमची उपस्थिती आपल्या दोन महान प्राचीन संस्कृतींमधील सखोल मैत्री आणि परस्पर आदराची साक्ष असेल.”नियोजित कार्यक्रमानुसार, ३ जुलै रोजी तेहरानमधील इमाम खोमेनी ग्रँड मसल्ला कॉम्प्लेक्समध्ये नेत्यावर अंत्यसंस्कार केले जातील, त्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रद्धांजली सभा आणि ६ जुलै रोजी अंत्ययात्रा निघेल.