कोपरीच्या अष्टविनायक चौकात रंगला उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव

0

शिंदेंच्या हस्ते ‘नशामुक्तीची हंडी’


ठाणे : शिवसेना कोपरी विभागाच्या वतीने कोपरी येथील अष्टविनायक चौकात आयोजित करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सवाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला. यावेळी त्यांच्या हस्ते ‘नशामुक्तीची हंडी’ फोडण्यात आली. तरुणांनी नशेच्या आहारी न जाता व्यसनांपासून दूर राहावे आणि आपल्या आयुष्याला सकारात्मक दिशा द्यावी, असे आवाहन शिंदे यांनी केले.

अष्टविनायक चौकात दहीहंडी उत्सवासाठी मोठी गर्दी झाली होती. ढोल-ताशांचा गजर, गोविंदा पथकांचा जल्लोष आणि ‘गोविंदा आला रे’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उत्सवाच्या माध्यमातून केवळ मनोरंजन न करता नशामुक्त समाजाचा संदेश देण्याचा प्रयत्न यंदा करण्यात आला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर अशोक वैती, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, महापौर शर्मिला पिंपळोळकर, सभागृह नेते हणमंत जगदाळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘दहीहंडीचा उत्सव उत्साहाचा, पण तरुणाईचा मार्ग नशामुक्तीचा’ असा संदेश देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नशामुक्तीची हंडी फोडली. तरुण पिढी ही देशाची आणि महाराष्ट्राची ताकद असून, या ताकदीला व्यसनांपासून दूर ठेवणे ही समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोपरीतील अष्टविनायक चौकात पार पडलेल्या या दहीहंडी उत्सवामुळे उत्सवाच्या जल्लोषासोबतच सामाजिक संदेशाचीही उंची वाढली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech