नवी दिल्ली : सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर हुती बंडखोरांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिक मोहम्मद युसूफ अली यांना सोमवारी धार्मिक विधींनुसार रियाध येथेच दफन करण्यात आले.अंत्यविधीच्या वेळी रियाधमधील भारताचे राजदूत विपुल आणि दूतावासातील इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी राजदूत आणि अन्य राजनैतिक अधिकाऱ्यांनी दिवंगत युसूफ अली यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनानुसार, राजदूतांनी पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. शनिवारी विमानतळावर हुती बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात युसूफ अली यांचा मृत्यू झाला होता, तर त्यांच्या कुटुंबातील तीन जण जखमी झाले होते.हुती बंडखोरांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रियाध येथील भारतीय दूतावासाने सौदी अरेबियात राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी नवी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. नागरिकांनी शांत राहावे, सतर्क राहावे आणि अत्यंत आवश्यक काम असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन दूतावासाने केले आहे.
तसेच, सौदी अरेबियातील विविध शहरांमध्ये घडणाऱ्या घटनांचे व्हिडिओ किंवा त्यासंबंधीच्या बातम्या समाजमाध्यमांवर प्रसारित करू नयेत, तसेच त्या आपल्या परिचितांना किंवा नातेवाइकांनाही पाठवू नयेत, असे दूतावासाने स्पष्ट केले आहे.या संदर्भात नागरिकांनी सौदी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. याशिवाय, दूतावासाच्या संपर्कात राहावे आणि कोणतीही असामान्य घटना आढळल्यास त्याची माहिती द्यावी, असा सल्लाही भारतीय नागरिकांना देण्यात आला आहे.उल्लेखनीय म्हणजे, सौदी अरेबियावर हुती बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून, १० भारतीय नागरिक जखमी झाले आहेत.