
कोल्हापूर : अखेर.. आज तो सुवर्णक्षण आला! हाय पॉवर कमिटीने माधुरीच्या परतीसाठी ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे आणि वनतारातून माधुरी हत्तीण नांदणी मठाकडे निघाली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी आपल्या सोशल मीडिया पेजवरुन दिली आहे. या भावनिक पोस्टमध्ये राजू शेट्टी यांनी म्हंटले आहे की “पैशाने विकली गेली नव्हती ती निष्ठा आणि ती नाती.……अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती !”
त्या काळरात्री जेव्हा तिला आपल्यापासून हिरावून नेलं गेलं, तेव्हा फक्त नांदणी मठ नाही, तर अख्खं कोल्हापूर ढसाढसा रडलं होतं… काळजावर जणू दगडच ठेवला गेला होता. एका गर्भश्रीमंत उद्योगपतीच्या बालहट्टासाठी आमची ४५० वर्षांची संस्कृती, परंपरा आणि वारसापायदळी तुडवला गेला. शासन, यंत्रणा आणि सर्वोच्च न्यायालय… सर्वांना हाताशी धरून नांदणी मठातील आमची लाडकी ‘माधुरी’ हत्तीण गुजरातच्या वनतारा येथे नेली गेली.माधुरी हत्तीला जाऊन १ वर्ष पूर्ण झालं. ३५ वर्ष जिने आपल्याला पोटच्या पोरासारखा लळा लावला, ती एका क्षणात आपल्याच घरातून परकी झाली होती.
कोल्हापूरच्या मातीने अन्याय सहन करायला कधी शिकवलंच नाही!
हा लढा सोपा नव्हता. एका बाजूला अफाट पैसा आणि सत्ता होती, तर दुसऱ्या बाजूला केवळ न्याय आणि अथांग प्रेम! मग उभा राहिला तो डोळ्यांत पाणी आणि मनात आग असलेला अभूतपूर्व जनआक्रोश आणि ४५ किमीची ती ऐतिहासिक पायी पदयात्रा… नांदणी ते कोल्हापूरपर्यंत रस्ते माणसांनी ओसंडून वाहत होते. पायाला फोड आले तरी कोणी थांबायला तयार नव्हतं. कडक ऊन, घरात निरंकार उपवास असतानाही केवळ “माधुरी परत यावी” म्हणून शेकडो माता-भगिनी रस्त्यावर चालत होत्या. त्यांच्या एका एका अश्रूने या अन्यायाविरुद्ध साक्ष दिली.गावागावातल्या तरुणांपासून ते देशातील सोशल मीडिया इन्फ्ल्युअर्सपर्यंत, प्रत्येकाने आपल्या लेखणीतून, व्हिडिओंमधून यंत्रणेला जाब विचारला आणि देशात एकच आवाज घुमला!
अखेर… जनशक्तीच्या अथांग सागरापुढे सर्वोच्च न्यायालयालाही झुकावं लागलं! ज्या सर्वोच्च न्यायालयाने तिला घेऊन जाण्याचा निर्णय दिला होता, त्याच न्यायालयाने लोकांच्या डोळ्यांतील पाणी, त्यांच्या भावना आणि जमिनीवरील वस्तुस्थिती पाहिली. लोकांच्या भावनांचा आदर करत न्यायालयाने पुनर्विचार केला. त्यानंतर हाय पॉवर कमिटीने (HPC) तज्ञांच्या समितीद्वारे नांदणी मठातील सर्व सोयीसुविधांची बारकाईने पाहणी केली. आणि अखेर.. आज तो सुवर्णक्षण आला! हाय पॉवर कमिटीने माधुरीच्या परतीसाठी ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे!
अडचणी अनेक आल्या, संकटांचे डोंगर उभे केले गेले, पण कोट्यवधी लोकांची इच्छाशक्ती त्या सर्व अडचणींपेक्षा खूप मोठी होती. वेळोवेळी झालेली ती आंदोलने, तो न्यायालयीन लढा आणि लोकांचा अथांग पाठपुरावा… यामुळेच ही अशक्य वाटणारी गोष्ट आज प्रत्यक्षात आली आहे. हा विजय कोणत्याही एका व्यक्तीचा नाही, हा विजय प्रत्येक त्या हाताचा आहे ज्याने माधुरीसाठी पाटी पकडली,त्या माता भगिनींचा आहे ज्यांनी निरंकार उपवास असताना पाण्याचा थेंबही न घेता ४५ किलोमीटर पायपीट केली , त्या पायांचा आहे जो रस्त्यावर चालला! सर्वोच्च न्यायालय, हाय पॉवर कमिटी, राज्य सरकार, तज्ञ कमिटी, प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया इन्फ्ल्युअर्स, सामाजिक संघटना आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या लढ्यात रक्ताचं पाणी करणाऱ्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात मावळ्यांचे मनापासून आभार! पैशाने तुम्ही साम्राज्य विकत घेऊ शकता, पण जनतेच्या काळजातील प्रेम कधीच नाही! लवकरच आपली माधुरी पुन्हा नांदणी मठात दिसेल आणि तिचा आवाज आपल्या मातीत गुंजेल!
सत्यमेव जयते! जनशक्तीचा विजय असो!