“मन की बात” राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा देणारे प्रभावी व्यासपीठ – भाजप भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार

0

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ या संवाद कार्यक्रमाचे भाजपच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात लाखो ठिकाणी सामूहिक श्रवण आयोजित करण्यात येते. महाराष्ट्रातही अधिकाधिक ठिकाणी या मन की बात कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण आयोजित करण्याचे आवाहन प्रदेश भाजपकडून करण्यात आले होते. त्याला भाजप लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

भाजपच्या इतर विभागांप्रमाणेच भटके विमुक्त मोर्चातर्फेही एकाच वेळी अनेक ठिकाणी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवणाचे आयोजन करण्यात आले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि प्रदेश सरचिटणीस तथा भटके विमुक्त मोर्चाचे प्रभारी राजेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यामार्फत २७४ ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला.

भटके विमुक्त मोर्चातर्फे आयोजित राज्याच्या विविध १६६ भागांमध्ये आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात १०८ ठिकाणी नागरिकांनी एकत्र येऊन ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण केले. विविध भागातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. राज्यभरातील विविध ठिकाणी झालेल्या या सामूहिक श्रवणामुळे ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसहभागाचे अनोखे उदाहरण पाहायला मिळाले.

संरक्षण उत्पादनातील भारताच्या वाढत्या क्षमतेचा गौरव…
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मनोगतात देशाच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवर विशेष भर देत सी-२९५ लष्करी विमान निर्मितीचा उल्लेख केला. “समुद्रापासून आकाशापर्यंत भारत स्वावलंबनाकडे वेगाने वाटचाल करत आहे,” असे सांगत त्यांनी संरक्षण उत्पादनातील भारताच्या वाढत्या क्षमतेचा गौरव केला. याशिवाय भारतीय शास्त्रज्ञ, अंतराळ संशोधनातील यश, नवकल्पना आणि जागतिक स्तरावर भारतीय तरुणांनी मिळविलेल्या उल्लेखनीय कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले.

भारतीयांच्या एकजुट, संयम आणि राष्ट्रहिताच्या बांधिलकीचे कौतुक…
पंतप्रधानांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसह विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा उल्लेख करत पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे, अंधश्रद्धेला थारा न देणे, पर्यावरण संवर्धन, नागरिकांची सामाजिक जबाबदारी आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने सक्रिय योगदान देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच जागतिक स्तरावर निर्माण होणाऱ्या विविध आव्हानांच्या काळात भारतीयांनी दाखविलेल्या एकजुटीचे, संयमाचे आणि राष्ट्रहितासाठीच्या बांधिलकीचेही त्यांनी कौतुक केले.

“मन की बात” राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा देणारे प्रभावी व्यासपीठ – भटके विमुक्त मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार
यावेळी भाजप भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले की “मन की बात’ हा केवळ संवादाचा कार्यक्रम नसून समाजात सकारात्मक परिवर्तन, जनसहभाग आणि राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा देणारे प्रभावी व्यासपीठ बनले आहे. अधिकाधिक नागरिकांपर्यंत पंतप्रधानांचा संदेश पोहोचावा, समाजोपयोगी विषयांबाबत जनजागृती व्हावी आणि नागरिकांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने राज्यभरात सामूहिक श्रवणाचे आयोजन करण्यात आले. भविष्यातही अशाच लोकाभिमुख आणि समाजहिताच्या उपक्रमांची मालिका सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्यभरातील भाजप भटके विमुक्त मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठे योगदान दिले. विक्रमी संख्येने आयोजित करण्यात आलेल्या या सामूहिक श्रवण कार्यक्रमामुळे ‘मन की बात’च्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत सकारात्मक विचार आणि राष्ट्रहिताचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech