डीपफेक प्रकरणी मार्क झुकरबर्ग यांनी सरकारकडे मागितली माफी; मेटाने मान्य केली चूक

0

नवी दिल्ली : मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी डीपफेक कंटेंटप्रकरणी भारत सरकारकडे माफीनामा सादर केला आहे. त्यांनी बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री (CSAM), डीपफेक कंटेंट आणि प्लॅटफॉर्मच्या कार्यपद्धतीतील त्रुटींबाबत दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारने मेटाला स्पष्ट शब्दांत सांगितले की, कंपनी केवळ ‘मध्यस्थ’ या कायदेशीर व्याख्येत बसत नाही. कारण कोणता मजकूर कोणत्या वापरकर्त्यापर्यंत पोहोचवायचा, याचा निर्णय कंपनी स्वतः घेते. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यानुसार मिळणारे ‘सेफ हार्बर’ (कायदेशीर संरक्षण) मेटाला लागू होणार नाही.

सरकारी सूत्रांच्या मते, मेटाने या संपूर्ण प्रकरणात आपली चूक मान्य करत खेद व्यक्त केला आणि माफी मागितली. तसेच, भारतातील सर्व कायद्यांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे सरकारने मेटाला स्पष्टपणे सांगितले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या कथित गैरवापराबाबतही सरकारने गंभीर चिंता व्यक्त केली.यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फेसबुक पोस्ट हटविल्याचा मुद्दाही सरकारने उपस्थित केला होता. तसेच, प्लॅटफॉर्मवरील आक्षेपार्ह आणि अश्लील स्वरूपाच्या सामग्रीचाही मुद्दा सरकारने मेटासमोर मांडला. त्यावर मेटाने उत्तर देताना, कंपनीकडे कठोर अंतर्गत नियम लागू असल्याचे सांगितले. तसेच, प्लॅटफॉर्मचा जाणीवपूर्वक गैरवापर कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नसल्याचेही स्पष्ट केले.

बुधवारी (5 ऑगस्ट) मेटाच्या जागतिक पथकाने माहिती तंत्रज्ञान (IT) मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फेसबुक पोस्ट हटविल्याच्या प्रकरणी केंद्र सरकारने मेटाच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावले होते. या बैठकीत महत्त्वाच्या पोस्टवर करण्यात आलेली चुकीची कारवाई, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री (CSAM) प्रभावीपणे रोखण्यात आलेले अपयश आणि इतर नियामक विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

याच दिवशी मेटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेतली. ही बैठक सुमारे अर्धा तास चालली.ही बैठक विशेष महत्त्वाची ठरली, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अलीकडील फेसबुक पोस्ट काही काळासाठी हटविल्यानंतर सरकारने मेटाच्या जागतिक स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावले होते.

या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी युवकांना संबोधित करत प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. या घटनेबाबत अमेरिकन कंपनी मेटाने तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचे सांगत माफी मागितली होती. तसेच, पोस्ट चुकून हटविली गेली होती आणि नंतर ती पुन्हा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech