राज्यातील काही भागांत मान्सूनचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता

0

मुंबई : महाराष्ट्रातील बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऑगस्ट महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही राज्यातील अनेक भागांत शेतीसाठी आवश्यक असा समाधानकारक पाऊस झालेला नाही. ऐन श्रावणात पावसाने अचानक दडी मारल्याने पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी काळात राज्यातील काही भागांत मान्सूनचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील विविध भागांत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर तुलनेने अधिक राहण्याची शक्यता असून, इतर भागांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. आज दक्षिण कोकण आणि गोवा परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने या भागांसाठी पावसाचा यलो अलर्ट दिला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत पुढील तीन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, हिंगोली यांसह काही भागांत पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथेही काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात पावसाचा खंड कायम असून सोयाबीन पिकाला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना स्प्रिंकलरच्या साह्याने पाणी द्यावे लागत आहे. सोयाबीन पीक फुलोऱ्यात आले असून दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याची नितांत गरज आहे. त्यातच अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पावसाअभावी पिकांवर पांढरा मावा आणि यलो मोझॅकसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या आगामी पावसाच्या अंदाजाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech