राज्यात पूरस्थिती, दरडी कोसळल्याने रस्ते-रेल्वे सेवा प्रभावित, ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करण्याचे आवाहन
मुंबई : जून महिना कोरडा ठाक गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातलाय. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊसाचं पाणी साचलं आहे. तर, काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे. आजही आयएमडीकडून अनेक शहरांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रायगड, चिपळूण, रत्नागिरीवर पुराच्या धोक्याचं सावट पसरलं आहे. तसेच, मुंबई-पुणे प्रवास सुखकर होण्यासाठी बांधण्यात आलेल्या मिसिंग लिंकवरही दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अशातच मुसळधार पावसाचा मुंबई लोकल ट्रेनवरही परिणाम झाला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गही प्रभावित झाला आहे.
अनेक रेल्वे रद्द करण्यात आली, तर काही रेल्वे आणि रस्ते वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली. मुंबईसह ठाणे, पालघर त्याचबरोबर कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. कारण अनक ठिकाणी रस्त्यांवर घरांमध्ये पाणी शिरलं आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळं काही भागात दुर्घटना देखील घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत राज्यात ९ जणांचा बळी गेला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. भिंत पडून ८ जणांचा बळी तर झाड पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मुंबई उपनगरात भिंत पडून ६ जण, पुण्यामध्ये एक जण तर ठाण्यामध्ये एक जणाचा भिंत पडून मृत्यू झाला आहे. तर मुंबई उपनगरामध्ये झाड पडून आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून मुसळदार पाऊस सुरु आहे. या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका सामान्य नागिकांना बसला आहे, अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरुप आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.