पुणे : इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च, वेष्टनासाठीच्या (पॅकिंग) कच्चा माल, दूध खरेदी दरात वाढ होत आहे. त्यामुळे गाई आणि म्हशीच्या पिशवी बंद दुधाच्या दरात दोन रुपयांनी, तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्यातील प्रमुख खासगी, सहकारी दूध संघांनी घेतला आहे, ही दरवाढ मंगळवारपासून (११ ऑगस्ट) लागू होणार आहे. नवीन दरानुसार, गायीच्या दुधाचा विक्री दर प्रतिलिटर ६० वरून ६२ रुपये, तर म्हशीच्या दुधाचा दर प्रतिलिटर ७६ वरून ७८ रुपये होणार आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही १० टक्क्यांपर्यंत वाढ केली जाणार असल्याने या दरवाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे
राज्यातील सहकारी आणि खासगी डेअरींची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज डेअरी) मध्ये झाली. संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वाढत्या उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला प्रमुख सहकारी आणि खासगी दूध संघांचे सुमारे २० प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण चांभारे यांचा दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गेल्या काही काळात डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे १० रुपयांनी वाढ झाली आहे. साखरेचे दरही प्रति किलो १२ रुपयांनी वाढले आहेत. त्याचबरोबर पॅकिंगच्या खर्चात ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून दूध खरेदीचे दरही वाढलेत. त्यामुळे दूध व्यवसायाचा एकूण खर्च वाढला असून दूध उत्पादकांवर आर्थिक ताण आला आहे. या वाढलेल्या खर्चाचा ताळमेळ साधणे आणि दूध उत्पादकांना त्यांच्या दुधाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पादन, पॅकिंग, वाहतूक आणि इतर खर्च वाढल्याने ही दरवाढ करणं आवश्यक असल्याचं बैठकीत सांगण्यात आले.