कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि केडीसीसी बँकेचे चेअरमन हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवून गोकुळ दूध संघाचा अध्यक्ष होणार, या चर्चेला स्वतःच पूर्णविराम दिला. मी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उभा राहणार नाही, अशी थेट स्पष्टोक्ती त्यांनी कागल मधील एका जाहीर कार्यक्रमात दिली.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे गेली दहा वर्षाहून अधिक काळ संचालक आणि चेअरमन पद सांभाळणारे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सहकार कायद्याप्रमाणे आता पुढील जिल्हा बँकेची निवडणूक स्वतः लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्यांचे सुपुत्र नविद मुश्रीफ गोकुळ दूध संघाचे चेअरमन होते. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी आ. सतेज पाटील यांच्या सोबत आघाडीचे नेतृत्व करून सत्ता हस्तगत केली होती. आता ते महायुतीच्या घटक पक्षात आहेत आणि आ. सतेज पाटील यांच्या आघाडीच्या विरोधात महायुतीची तयारी सुरु आहे.
या पार्श्वभूमीवर पुन्हा नविद मुश्रीफ हेच गोकुळच्या निवडणुकीत उतरणार असे चित्र असताना स्वतः मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा बँकेतून बाजूला होऊन गोकुळच्या रणांगणात येतील आणि चेअरमन होतील अशी चर्चा सुरु झाली. स्वतः मंत्री मुश्रीफ यांनी कागल येथील एका जाहीर कार्यक्रमात आपण गोकुळची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट करून या चर्चेला पूर्णविराम दिला.