परतवाडा प्रकरणाची राज्यस्तरीय दखल; अल्पसंख्यांक आयोगाची टीम अमरावतीत

0

अमरावती : परतवाडा येथे घडलेल्या तरुणींच्या लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली असून या प्रकरणाची दखल घेत राज्य अल्पसंख्यांक आयोगाची टीम अमरावतीत दाखल झाली आहे. प्रकरणाच्या संवेदनशीलतेच्या पार्श्वभूमीवर आयोगाने स्थानिक पोलिस प्रशासनाशी थेट संवाद साधत तपासाची सविस्तर माहिती घेतली.या भेटीदरम्यान आयोगाच्या सदस्यांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन तपासाचा आढावा घेतला.

या प्रकरणातील आतापर्यंतची कारवाई, पुरावे, तपासाची दिशा तसेच पुढील पावले याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. तपास जलदगतीने व निष्पक्षपणे पार पाडला जावा, यासाठी आयोगाने स्पष्ट भूमिका घेतली आहे.आयोगाच्या टीमचे नेतृत्व करणारे सदस्य मुस्ताक खान पठाण यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे. कोणत्याही आरोपीला वाचवले जाणार नाही. पीडितांना न्याय मिळवून देणे हीच आमची प्राथमिकता आहे.” तसेच पीडितांच्या सुरक्षिततेसाठी आणि गोपनीयतेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात पोलिसांकडून तांत्रिक पुरावे, डिजिटल डेटा तसेच संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून तपासाला गती देण्यात आली आहे. आयोगानेही प्रशासनाशी समन्वय ठेवून तपासाची प्रगती नियमितपणे पाहणी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील कारवाई अधिक काटेकोरपणे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, महिला व बालकल्याण विभागानेही या प्रकरणाची दखल घेतली असून पीडित मुलींना आवश्यक ती मदत, समुपदेशन व संरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मानसिक धक्का बसलेल्या पीडितांना सावरण्यासाठी विशेष समुपदेशनाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे अमरावती जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दोषींवर कठोर कारवाई करून पीडितांना न्याय मिळवून देण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.एकूणच, राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या या हस्तक्षेपामुळे तपासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता पुढील काळात पोलिस तपास आणि प्रशासकीय कारवाई कितपत प्रभावी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech