संघ मुख्यालयाला घेरावाची खोटी पोस्ट व्हायरल; गुन्हा दाखल

0

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) महाल येथील अतिसंवेदनशील मुख्यालयाला हजारो विद्यार्थ्यांनी घेराव घातल्याची खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी नागपुरातील कोतवाली पोलिस ठाण्यात एका सोशल मीडिया युजरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भातील माहितीनुसार ‘वीझ पुनित’ नावाच्या ‘एक्स’ (ट्विटर) अकाऊंटवरून 24 जुलै रोजी ही पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला हजारो विद्यार्थ्यांनी घेराव घातल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच पोस्टमधील मजकुरातून संघाच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या पोस्ट प्रसारित होत असताना संबंधित युजरने ही माहिती शेअर केल्याचे समोर आले.कोतवाली पोलिसांच्या गुप्त विभागातील पोलिस हवालदार अनिल रामाजी बोंद्रे यांना या पोस्टची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने संघ मुख्यालय परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र, तिथे विद्यार्थ्यांनी घेराव घातल्याची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांच्या माहितीनुसार, संवेदनशील ठिकाणाबाबत चुकीची माहिती पसरवून जनतेमध्ये भीती निर्माण करणे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार अनिल बोंद्रे यांच्या फिर्यादीवरून ‘@वीझपुनित’ या खातेदाराविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम 353 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल कातकाडे तपास करत आहेत. सायबर सेलच्या मदतीने संबंधित युजरचा शोध सुरू आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech