नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – पालकमंत्री मकरंद आबा पाटील

0

पालकमंत्र्यांकडून दुष्काळसदृश्य परिस्थितीची बांधावर जाऊन पाहणी

बुलढाणा : ”पावसातील खंडामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची वस्तुस्थिती प्रत्यक्ष बांधावर जाऊन जाणून घेतली आहे. नुकसानग्रस्त एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी अचूक पंचनामे करून शासनस्तरावर आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” अशी ग्वाही बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी दिली.

बुलढाणा जिल्ह्यात पावसातील खंड, अनियमित पर्जन्यमान आणि त्याचा खरीप पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीची पालकमंत्री पाटील यांनी आज चिखली तालुक्यातील हातणी, मालगणी, केळवद तसेच चिखली शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतातील पिकांची अवस्था, पावसाची स्थिती तसेच पिकांवर झालेला परिणाम याची पाहणी करून शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधला.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या ७७.९ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांमध्ये २० दिवसांपेक्षा अधिक कालावधीचा पावसाचा खंड पडला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या केवळ ५३.७ टक्के, तर सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या केवळ ३०.७ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे सोयाबीन, मका, कापूस, ज्वारी, मुग अशा खरीप पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला असून यावर्षी उत्पन्नात सरासरी ५० ते ६० टक्के घट होण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यात खरीप पेरणीचे क्षेत्र ६ लाख ७३ हजार ६५ हेक्टर असून, त्यापैकी २ लाख ३३ हजार ४३१ हेक्टर क्षेत्र पीक विम्याने संरक्षित आहे. तर ४ लाख ३९ हजार ६३४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाबाहेर आहे.

पाहणीदरम्यान पालकमंत्री पाटील यांनी नुकसानग्रस्त भागातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याचा पंचनामा अचूकपणे होईल, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले. तसेच पीक विमा कंपन्यांनी नुकसानीच्या दाव्यांबाबत टाळाटाळ न करता नियमानुसार शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार मनोज कायंदे, आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी, संबंधित अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech