आमदार सना मलिक शेख यांचा पुढाकार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सना मलिक-शेख यांच्या पुढाकाराने अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये ‘युवाज २०२६’ या भव्य युवा महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांनी अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये उभारलेल्या विकासाची… जनसेवेची… आणि संघर्षाची परंपरा पुढे नेण्याचे काम आमदार सना मलिक – शेख सध्या करत आहेत.
‘आंदोलनही, प्रगतीही, आणि आता नोकरीची वेळही.. ! या प्रभावी विचाराच्या भूमिकेतून स्थानिक सुशिक्षित तरुणाईच्या हाताला हक्काचे काम मिळवून देण्यासाठी आमदार सना मलिक-शेख यांनी हा संकल्प केला आहे. हा युवा महारोजगार मेळावा रविवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मानखुर्द (पूर्व) येथील सायन–पनवेल हायवे लगत, अणुशक्तीनगर सिग्नलजवळ असलेल्या मातोश्री विद्यामंदिर येथे पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तरुणांच्या भविष्याला नवी दिशा देणारा उपक्रम राबवून लोकसेवेचा वारसा अधिक सक्षम करण्यावर जास्त भर असल्याचे आमदार सना मलिक-शेख यांनी स्पष्ट केले आहे.
या महारोजगार मेळाव्यात १० वी, १२ वी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका (Diploma) तसेच पदवीधर उमेदवारांसाठी नामवंत कंपन्या थेट ऑन-द-स्पॉट मुलाखती घेऊन रोजगार देणार आहेत. करिअर समुपदेशन व मार्गदर्शन सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध असून, इच्छुकांनी आपले बायोडाटा (CV) सोबत आणावेत आणि www.sanamalikshaikh.in/yuvaaz या संकेतस्थळावर विनामूल्य नावनोंदणी करावी, असे आवाहन आमदार सना मलिक-शेख यांनी केले आहे.