बहुतांश जागांवर डिपॉझिट जप्त; नोटा पेक्षाही कमी मते
कोलकाता | प्रतिनिधी
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा धक्का बसला आहे तो असादुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमआयएम पक्षाला. बिहारमधील यशाची पुनरावृत्ती बंगालमध्ये करण्याचे ओवेसींचे स्वप्न ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यातील, भाजपाच्या लाटेत लाटेत पूर्णपणे वाहून गेले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत ५ जागा जिंकून ‘किंगमेकर’ ठरणाऱ्या असादुद्दीन ओवेसींच्या जादूचा बंगालमध्ये सपशेल ‘खेला’ झाला आहे. मुर्शिदाबाद, मालदा आणि उत्तर दिनाजपूर या मुस्लिम बहुल जिल्ह्यांमध्ये मोठा प्रभाव पाडण्याचा दावा करणाऱ्या एमआयएमआयएम ला एकाही जागेवर साधे खातेही उघडता आले नाही. उलट, अनेक जागी त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होण्याची वेळ आली आहे.
ओवेसींनी बंगालमध्ये सुमारे २५ महत्वाच्या जागांवर उमेदवार उभे केले होते. पण, हाती काय लागले, तर – शून्य जागा. राज्यातील एकूण मतांपैकी पक्षाला १.५% पेक्षाही कमी मते मिळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनेक मतदारसंघांत त्यांना ‘नोटा’ पेक्षाही कमी मते मिळाली आहेत.
ओवेसी का अपयशी ठरले?
१. ममतांकडे मुस्लिम मतांचे एकत्रीकरण: बंगालमधील मुस्लिम मतदारांनी भाजपला रोखण्यासाठी ‘विभाजन’ न होऊ देता एकगठ्ठा ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला कौल दिला. ओवेसींना मत देणे म्हणजे भाजपचा मार्ग मोकळा करणे, ही भीती मतदारांमध्ये घर करून होती.
२. ‘बी-टीम’ चा ठपका: निवडणुकीच्या प्रचारात ममता बॅनर्जी यांनी ओवेसींचा उल्लेख “भाजपची बी-टीम” (व्होट कटर) असा सातत्याने केला. हा प्रचार तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यात टीएमसी यशस्वी ठरली, ज्यामुळे ओवेसींची विश्वासार्हता कमी झाली.
३. स्थानिक नेतृत्वाचा अभाव: बिहारमध्ये ओवेसींकडे अख्तरुल इमान यांच्यासारखा मोठा स्थानिक चेहरा होता. बंगालमध्ये मात्र त्यांच्याकडे असा कोणताही प्रभावी स्थानिक नेता नव्हता, जो मतदारांशी संवाद साधू शकेल.
४. बाहेरचा पक्ष : “बंगालचे राजकारण बंगालीच ठरवणार,” या ममतांच्या अस्मितेच्या राजकारणासमोर हैदराबादहून आलेले ओवेसी टिकू शकले नाहीत. बंगाली संस्कृती आणि तिथल्या स्थानिक प्रश्नांशी ओवेसींचे उमेदवार नाळ जोडू शकले नाहीत.
ओवेसींच्या ‘एंट्री’मुळे बंगालमधील लढत त्रिकोणी होईल, असे वाटले होते. मात्र, बंगालच्या मतदारांनी आपला कौल स्पष्टपणे भाजपा आणि ममता बॅनर्जींच्या पारड्यात टाकत ओवेसींना पुन्हा एकदा रिकाम्या हाती हैदराबादला पाठवले आहे.