पॅरिस : फ्रान्समधील प्रसिद्ध रेनॉयर म्युझियममध्ये मंगळवारी दोन चोरट्यांनी घुसून तब्बल ९८ कोटी रुपयांच्या चार मौल्यवान चित्रांची चोरी केली. या घटनेमुळे फ्रान्समधील संग्रहालयांच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कॅग्नेस-सुर-मेर शहराचे महापौर ब्रायन मेसन यांनी सांगितले की,संग्रहालयातून चोरी करून पळून जात असताना दोन्ही संशयित शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले आहेत. घाईघाईने पळताना चोरट्यांच्या हातातून एक चित्र खाली पडले. पोलिसांनी ते चित्र ताब्यात घेतले आहे. मात्र, उर्वरित तीन कलाकृती चोरटे सोबत घेऊन जाण्यात यशस्वी झाले.
महापौर मेसन यांच्या म्हणण्यानुसार, संग्रहालयाचा सुरक्षा अलार्म पहाटे 5 वाजून 48 मिनिटांनी वाजला. अलार्म वाजताच महापालिका पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आणि अवघ्या पाच मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. मात्र, पोलिस पोहोचेपर्यंत चोरट्यांनी चोरी करून तेथून पळ काढला होता. हे संग्रहालय प्रसिद्ध फ्रेंच प्रभाववादी चित्रकार पियरे-अगस्ट रेनॉयर यांना समर्पित आहे. १९१९ मध्ये निधन होण्यापूर्वी रेनॉयर यांचे हे शेवटचे घर होते. त्यानंतर १९६० मध्ये या घराचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले. येथे रेनॉयर यांच्या प्रसिद्ध चित्रांसोबतच त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक वैयक्तिक वस्तू, जसे की त्यांचा चित्रफलक आणि व्हीलचेअरही जतन करून ठेवण्यात आली आहे.
ही चोरी अशा वेळी झाली आहे, जेव्हा वर्षभरापेक्षाही कमी काळापूर्वी पॅरिसमधील अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या लूव्हर म्युझियममध्ये दिवसाढवळ्या मोठी चोरी झाली होती.त्या घटनेत चोरट्यांनी सुमारे १०० दशलक्ष डॉलर किमतीच्या आठ मौल्यवान वस्तू लंपास केल्या होत्या. रेनॉयर म्युझियममधील या नव्या चोरीच्या घटनेमुळे कला जगतात लूव्हर म्युझियममधील त्या धक्कादायक चोरीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.