विदेशी पत्रकारांवर पाकिस्तानचे नवे निर्बंध; शहराबाहेर वृत्तांकनासाठी पूर्वपरवानगी अनिवार्य

0

इस्लामाबाद : पाकिस्तानने देशात वृत्तांकन करणाऱ्या परदेशी पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींसाठी नवे मार्गदर्शक नियम जारी केले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, इस्लामाबाद, लाहोर आणि कराची वगळता इतर कोणत्याही शहरात वृत्तांकनासाठी जाण्यापूर्वी सर्व परदेशी पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींना अनापत्ती प्रमाणपत्र (एनओसी) घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर (पीओके)मध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर हे नवे नियम लागू करण्यात आले असून, या आंदोलनांकडे जगभराचे लक्ष वेधले गेले आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, माहिती मंत्रालयाच्या एक्स्टर्नल पब्लिसिटी (ईपी) विंगमध्ये नोंदणीकृत सर्व परदेशी पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींना आता इतर कोणत्याही शहरात जाण्यापूर्वी अनिवार्यपणे एनओसी घ्यावा लागणार आहे. बातम्या, माहितीपट (डॉक्युमेंटरी), चित्रपट, व्हिडिओ किंवा अधिकृत कामासाठी सोशल मीडियावरील सामग्री तयार करण्यासाठीही हा नियम लागू असेल. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, परदेशी पत्रकारांना ईपी विंगकडे ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर पाकिस्तान सरकारकडून क्यूआर कोडयुक्त पीव्हीसी मान्यता कार्ड जारी केले जाणार आहे.

वृत्तानुसार, मान्यता कार्ड जारी होण्यासाठी चार ते सहा आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, तर नोंदणी प्रक्रिया सात कामकाजाच्या दिवसांत पूर्ण केली जाईल. हे नियम आंतरराष्ट्रीय मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यम संस्थांना लागू असतील. वेब-आधारित प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया माध्यमांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. तसेच, परदेशात राहून विदेशी माध्यमांसाठी काम करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकारांनाही हे नियम लागू असतील.

सूचनेनुसार, कोणत्याही मान्यता अर्जाला मंजुरी देणे किंवा नाकारणे हा अधिकार ईपी विंगकडे राखीव असेल. अर्ज नाकारल्यास संबंधित पत्रकारांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांकडे अपील करण्याची मुभा असेल.सूचनेत पुढे म्हटले आहे की, ईपी विंगकडून आधीच मान्यता किंवा नोंदणी मिळालेल्या सर्व परदेशी आणि आंतरराष्ट्रीय माध्यम प्रतिनिधींनी इस्लामाबाद, लाहोर आणि कराची वगळता इतर कोणत्याही शहरात अधिकृत कामासाठी वृत्तांकन, बातमी, व्हिडिओ, चित्रपट, माहितीपट किंवा सोशल मीडिया सामग्री तयार करण्यासाठी जाण्यापूर्वी ईपी विंगकडून अनिवार्यपणे एनओसी प्राप्त करावा लागेल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech