विकसित भारताच्या संकल्पात पालघरचा सहभाग अनिवार्य – राज्यपाल

0

पालघर : भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करताना समाजातील अंतिम घटकाचा विकास करणे व त्या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. पालघरच्या सर्वांगीण विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज डहाणू येथे केले.

मार्च २०२६ मध्ये राज्याच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यपालांचा हा पहिलाच पालघर जिल्हा दौरा असल्याने पालघरवासियांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. अक्षय्य तृतीया आणि भगवान श्री परशुराम जयंतीच्या शुभ मुहूर्तावर डहाणू तालुक्यातील ओसरविरा येथे वनबंधू ट्रस्ट आणि भारत विकास संगम यांच्याद्वारे पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका सेवांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी भारत विकास संगमचे संरक्षक संजय पटेल, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वनबंधू ट्रस्टचे अध्यक्ष आणि विश्वस्त लाडूलाल सोनी, योगायतन ग्रुपचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रताप सिंह, ज्येष्ठ समाजसेवक सुशील सिंघानिया आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

आपल्या भाषणाची सुरुवात ‘सर्वे भवन्तु निरामय:’ या मंत्राचा उल्लेख करीत त्यांनी केली व आरोग्य सुविधा केवळ शहरांपुरत्याच मर्यादित न राहता त्या दुर्गम भागात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे, हा आपला मुख्य संकल्प आहे. पालघर जिल्ह्यासारख्या आदिवासीबहुल क्षेत्रात रोजगार, आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याची समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पालघरमध्ये एक ‘आदर्श गाव’ संकल्पना राबविण्यासाठी लोकभवन स्तरावर नियोजन सुरू असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. यासाठी लवकरच जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन एक सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech