चंदीगड आणि जालंधर रेल्वे स्थानकांसह रवनीत सिंग बिट्टू यांनाही धमकी
चंदीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ जुलै रोजी होणाऱ्या पंजाब दौऱ्यापूर्वी चंदीगड, मोहाली आणि जालंधर परिसरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. चंदीगड आणि मोहालीतील अनेक शाळांना पुन्हा एकदा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला असून त्यामध्ये १७ जुलै रोजी विविध ठिकाणी आयईडीद्वारे स्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला आहे. या धमकीनंतर पोलिस, गुप्तचर यंत्रणा आणि रेल्वे सुरक्षा दल यांनी तातडीने तपास सुरू केला असून संवेदनशील ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १७ जुलै रोजी पंजाब दौऱ्यावर येणार असून जालंधर कॅंट रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाचा त्यांचा कार्यक्रम प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर आलेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये चंदीगड आणि मोहालीतील शाळांसह मोहाली महापौर कार्यालयालाही लक्ष्य करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच चंदीगड आणि जालंधर रेल्वे स्थानकांवर आयईडी स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणांनी या सर्व ठिकाणांची तपासणी सुरू केली असून परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
धमकीच्या ई-मेलमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय पंजाबमधील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित राहू नये, अशीही चेतावणी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी ई-मेलचा स्रोत शोधण्याचे काम सुरू केले असून सायबर तज्ज्ञांचीही मदत घेतली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून चंदीगड आणि मोहालीतील शाळांना अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल सातत्याने येत आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आधीपासूनच सतर्क होत्या. नव्याने आलेल्या धमकीनंतर शाळा, शासकीय कार्यालये, रेल्वे स्थानके आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. कोणतीही विपरीत घटना घडू नये यासाठी प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.