नवी दिल्ली : केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने यावर्षीच्या पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या ३१ जुलै २०२६ या पूर्वनियोजित तारखेला मुदतवाढ देत १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत हे अर्ज सादर करण्याची परवानगी दिली आहे. राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलच्या (https://awards.gov.in) माध्यमातून प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी (पीएमआरबीपी) नामांकन सादर करण्याची प्रक्रिया १ एप्रिल २०२६ रोजी सुरु झाली. शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांमध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या बालकांना हे पुरस्कार देण्यात येतात.
भारताचा रहिवासी तसेच भारतीय नागरिक असलेले, वयाची पाच वर्षे पूर्ण केलेले पण ३१ जुलै २०२६ रोजी ज्याचे वय १८ वर्षांहून अधिक नाही अशी मुले या पुरस्कारासाठी पात्र आहेत. स्वयंनामनिर्देशन तसेच कोणत्याही नागरिकाने केलेल्या शिफारसीसह सादर होणारी सर्व नामांकने केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलच्या माध्यमातूनच स्वीकारली जातील. अधिक तपशीलासाठी कृपया राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलच्या https://awards.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.