लातूर : ‘नेत्रकोष’ पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन महाराष्ट्रातील अग्रगण्य नेत्ररोगतज्ज्ञ, मूळचे शिराढोण (ता. निलंगा) येथील सुपुत्र डॉ. अनिल दूधभाते लिखित ‘नेत्रकोष’ या अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक पुस्तकाचे प्रकाशन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, वैद्यकीय तज्ज्ञ तसेच वाचकांची लक्षणीय उपस्थिती होती.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येते. या पार्श्वभूमीवर ‘नेत्रकोष’ हे पुस्तक सर्वसामान्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. या पुस्तकामध्ये दैनंदिन जीवनात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, मोबाईल व संगणकाच्या वाढत्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम, तसेच विविध नेत्ररोगांची लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार याबाबत सविस्तर माहिती सोप्या भाषेत देण्यात आली आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “डोळे हे मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचे अवयव असून त्यांच्या आरोग्याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. ‘नेत्रकोष’ सारखे पुस्तक समाजाला योग्य दिशा देणारे आहे.” त्यांनी डॉ. अनिल दूधभाते यांच्या कार्याचे कौतुक करत, त्यांच्या प्रयत्नांमुळे सर्वसामान्यांना मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
डॉ. अनिल दूधभाते हे गेली अनेक वर्ष नेत्रसेवेत कार्यरत असून त्यांनी हजारो रुग्णांना दृष्टीदान देण्याचे मोलाचे कार्य केले आहे. ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांसाठी त्यांनी विविध आरोग्य शिबिरे आयोजित करत नेत्रसेवा अधिक व्यापक केली आहे. त्यांच्या अनुभवसंपन्न ज्ञानाचा ठेवा ‘नेत्रकोष’ या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचत आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन नागरिक अधिक सजग होतील, तसेच वेळेवर उपचार घेण्यास प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.