पावसाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पर्यटनस्थळांवर निर्बंध; ३१ ऑगस्टपर्यंत गड-किल्ल्यांवर प्रवेशबंदी

0

पुणे : जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात वाढणारी पर्यटकांची गर्दी, संभाव्य अपघात आणि कायदा-सुव्यवस्था लक्षात घेऊन मावळ तालुक्यातील अनेक गड-किल्ले आणि पर्यटनस्थळांवर ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.

या आदेशानुसार लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना किल्ले तसेच भाजे धबधबा येथे पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय लोणावळा परिसरातील टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट, एकवीरा देवी-कार्ला लेणी आणि पवना धरण परिसर या लोकप्रिय पर्यटनस्थळांवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या मते, अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका वाढला असून, धबधबे आणि दऱ्यांमध्ये पाण्याचा वेगही वाढला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली मुंबई–पुणे रेल्वेची घाटमार्गावरील वाहतूक आता टप्प्याटप्प्याने पूर्ववत होत आहे. घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली असून, दुसरी मार्गिका रात्री उशिरापर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. मात्र तिसरी मार्गिका सुरू होण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech