नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर असलेले इस्माइली समुदायाचे ५० वे इमाम प्रिन्स रहीम आगा खान पंचम यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भारत आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क यांच्यातील विविध क्षेत्रांतील सहकार्य व भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या उपायांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत या भेटीची माहिती दिली. यासंदर्भातील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले की, प्रिन्स रहीम आगा खान पंचम यांची भेट घेऊन आनंद झाल्याचे सांगताना मोदी यांनी त्यांचे वडील दिवंगत आगा खान चतुर्थ यांच्या विकास क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाचे स्मरण केले.आरोग्यसेवा, शेती, ग्रामीण विकास तसेच युवक आणि महिलांचे सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कसोबतची भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केल्याचे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केले.
यापूर्वी प्रिन्स रहीम आगा खान पंचम यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर जयशंकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल समाधान व्यक्त केले. आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्ककडून सामाजिक विकास आणि वारसा संवर्धनाच्या क्षेत्रात सुरू असलेल्या विविध उपक्रमांवर यावेळी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतासह परदेशातील सहकार्याच्या संभाव्य संधींबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
प्रिन्स रहीम आगा खान पंचम बुधवारी भारतात दाखल झाले. पन्नासावे इमाम म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांचा दौरा ९ ते १५ सप्टेंबरदरम्यान होत असून, परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या निमंत्रणावरून हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.या दौऱ्यात प्रिन्स रहीम आगा खान पंचम अहमदाबाद, मुंबई आणि हैदराबादला भेट देणार आहेत. त्याचप्रमाणे ते उपराष्ट्रपतींसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. या शहरांसह विविध भागांमध्ये आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क विकासकामे आणि सामुदायिक उपक्रम राबवत आहे.
फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांचे वडील प्रिन्स करीम आगा खान चतुर्थ यांच्या निधनानंतर प्रिन्स रहीम आगा खान पंचम यांनी इस्माइली समुदायाच्या ५० व्या इमामपदाची धुरा स्वीकारली. प्रिन्स करीम अल-हुसैनी आगा खान चतुर्थ हे शिया इस्माइली मुस्लिमांचे ४९ वे इमाम होते.आगा खान चतुर्थ यांनी आपले जीवन लोककल्याणासाठी समर्पित केले होते. जगातील गरीब आणि वंचित समुदायांच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांनी १९६७ मध्ये आगा खान फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेमार्फत आफ्रिका, आशिया, युरोप, मध्य पूर्व आणि उत्तर अमेरिका यांसह विविध भागांमध्ये विकासविषयक उपक्रम राबवले जातात.