मुंबई : मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (टीबीएम) आज विक्रोळी शाफ्टमधून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील बांधकामाधीन मुंबई स्टेशनकडे बोगदा खोदण्याचे काम सुरू केले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कामाचे औपचारिक उद्घाटन करायचे होते, मात्र प्रतिकूल हवामान आणि रेड अलर्ट लक्षात घेऊन हा कार्यक्रम काल रात्रीच रद्द करण्यात आला, तरीही मशीनने आज नेहमीप्रमाणे काम सुरू केले. प्रकल्प राबवणाऱ्या राष्ट्रीय उच्चगती रेल्वे महामंडळाने आज येथे सांगितले की, एकूण २१ किलोमीटर लांबीच्या भूमिगत बोगदा विभागापैकी मुंबईतील सावली (घणसोली) आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यानचा १६ किलोमीटरचा भाग टनेल बोरिंग मशीनद्वारे तयार केला जाणार आहे. उर्वरित ५ किलोमीटरचा भाग न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) वापरून आधीच पूर्ण करण्यात आला आहे.
विक्रोळी येथून लाँच केलेली टीबीएम ६ किलोमीटर लांबीचा सिंगल-ट्यूब बोगदा खोदणार आहे, जो बुलेट ट्रेनच्या अप आणि डाउन दोन्ही ट्रॅकसाठी डिझाइन केला आहे. ही मशीन दाट शहरी भागातून जाईल, ज्यामध्ये बहुमजली इमारती, रस्ते, मिठी नदी आणि इतर महत्त्वाची पायाभूत संरचना समाविष्ट आहे. ही टीबीएम भारतात रेल्वे बोगदा बांधकामासाठी वापरल्या गेलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मशीनपैकी एक आहे. यात १३.६ मीटर व्यासाचा (४ मजली इमारतीच्या उंचीइतका) मोठा कटरहेड आहे, त्याचे वजन ३,१०० टन (५०० आशियाई हत्तींच्या समतुल्य) आहे आणि त्याची एकूण लांबी ९६ मीटर (फुटबॉल मैदानाच्या लांबीजवळ, १०५ मीटर) आहे.
मशीनमध्ये कटर व्हील/हेड, मेन बेअरिंग, जॉ क्रशर, इरेक्टर, मेन शील्ड, टेल शील्ड आणि चार विशेष गॅन्ट्री यांसारखे अनेक महत्त्वाचे घटक आहेत, जे बोगदा खोदकामात मदत करतात. कटर व्हील ४ राऊंड प्रति मिनिट म्हणजेच ४ फेऱ्या प्रति मिनिट या वेगाने फिरते. वापरात असलेली मशीन मिक्सशील्ड टीबीएम आहे, जी एक प्रगत स्लरी-प्रकारची टनेलिंग प्रणाली आहे, जी विशेषतः मिश्र भूभाग आणि उच्च भूजल दाबाच्या परिस्थितीत मोठ्या व्यासाचे बोगदे खोदण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. मिक्सशील्ड तंत्रज्ञान खोदकामादरम्यान बोगद्याच्या समोरील भागाला स्थिर ठेवण्यासाठी दाबयुक्त बेंटोनाइट द्रावणाचा वापर करते. ही सिद्ध तंत्रज्ञान जटिल भूवैज्ञानिक परिस्थिती आणि आव्हानात्मक शहरी वातावरणासाठी विशेषतः उपयुक्त आहे.
ही प्रगत टनेलिंग पद्धत खास मुंबई सबअर्बन सेक्शनसाठी निवडण्यात आली आहे, कारण ती जमीन खचणे नियंत्रित करण्याची आणि दाट वस्तीच्या भागांमध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर कोणताही अडथळा किंवा असुविधा कमी करण्याची उत्तम क्षमता देते. या टीबीएमचा एक मुख्य फायदा असा आहे की ती एकाच वेळी बोगदा खोदणे आणि सेगमेंट रिंग बसवणे हे काम करू शकते. ही एकत्रित प्रक्रिया सुरक्षितता वाढवते आणि टनेलिंगचा वेग लक्षणीयरीत्या वाढवते, ज्यामुळे प्रकल्प लवकर पूर्ण होण्यास मदत होते.
टीबीएम लाँच करण्यासाठी मुंबईतील विक्रोळी येथे जमिनीखाली ५६ मीटर खोल शाफ्ट तयार करण्यात आला आहे—जो जमिनीखाली सुमारे २० मजली इमारतीइतका आहे. शाफ्ट परिसरात टीबीएम ऑपरेशनसाठी आवश्यक अनेक सपोर्ट सिस्टम बसवण्यात आले आहेत, ज्यामध्ये वॉटर ट्रीटमेंट प्लांट, स्लरी ट्रीटमेंट प्लांट, बेंटोनाइट स्टोरेज टँक, समर्पित पॉवर सबस्टेशन, बॅकअप जनरेटर सेट, ग्राउटिंगसाठी रेडी-मिक्स काँक्रीट प्लांट, स्लरी ट्रान्सपोर्ट सिस्टम, सिवेज ट्रीटमेंट प्लांट, बॅकअप गॅन्ट्री आणि इतर लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर यांचा समावेश आहे.