राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

0

घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भात दमदार सरींची शक्यता

मुंबई : गेल्या दीड महिन्यापासून महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असली, तरी आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती, अरबी समुद्रातील वाढलेला वाऱ्याचा वेग आणि वातावरणातील वाढलेली आर्द्रता यामुळे पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विशेषतः घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, खरीप हंगामातील पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरणार आहे.

गेल्या वीस दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत होते. सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांना पाण्याअभावी फटका बसत होता. काही भागांत दुबार पेरणीची वेळही आली होती. मात्र आता वातावरणात झालेल्या बदलामुळे पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी पुणे, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे. तसेच वाशीम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला आहे.

सोमवारी मराठवाड्यातील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, त्यानंतर २१ जुलै रोजी रायगड, पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर तर २२ जुलै रोजी रत्नागिरी, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, परभणी जिल्ह्यात तब्बल तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत असून, पुढील काही दिवसही पावसाची साथ कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच धरणांतील पाणीसाठा वाढण्यासही या पावसाचा मोठा हातभार लागेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech