एमपीएससी विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांबाबत राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

0

मुंबई : पुण्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात येत्या काही दिवसांत चांगली बातमी मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचे राज ठाकरे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे सांगितले.

परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचा समावेश आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला महाराष्ट्रातील विविध राजकीय नेत्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत आपली भूमिका मांडली आहे. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज ठाकरे यांनीही आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मी तुमचं म्हणणं, विद्यार्थ्यांच्या रास्त अपेक्षांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, स्वतःचा जिल्हा, तालुका, घर आणि कुटुंब सोडून नोकरी मिळवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या तरुण-तरुणींना पाहून मन व्यथित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आज मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्रीही या विषयावर सकारात्मक असल्याचे जाणवले, असे त्यांनी नमूद केले.

येत्या काही दिवसांत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात चांगली बातमी येईल, अशी अपेक्षा व्यक्त करत राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या आंदोलनातील मागण्यांबाबत सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे विद्यार्थ्यांसह राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांचे लक्ष लागले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech