महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांची सरकारवर जोरदार टीका

0

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरही निशाणा साधला. देशातील सध्याची परिस्थिती, तरुणांच्या अपेक्षा, जेन झी पिढीचे प्रश्न, शिक्षण व्यवस्था आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनो आणि कधीकाळी विद्यार्थी असलेल्यांनो. बघायला आला का ऐकायला. विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन असल्याचे सांगत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात विद्यार्थी सेनेतून झाल्याचे नमूद केले. काम करत, शिकत आणि घडत आपण इथपर्यंत पोहोचलो असल्याचे त्यांनी सांगितले. अमित आणि त्यांचे सहकारी चांगले काम करतील, तसेच सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राज ठाकरे यांनी सांगितले की, आपण कामाला सुरुवात केली तेव्हा काळ वेगळा होता आणि त्यावेळचे विषयही वेगळे होते. “आम्ही टेलिग्रामपासून ते इन्स्टाग्रामपर्यंतचा काळ पाहिला आहे,” असे म्हणत त्यांनी सध्याच्या जेन झी पिढीबाबत भाष्य केले. १९९७ नंतर जन्मलेली आणि २०११-१२ पर्यंतची ही पिढी केवळ मुंबई, पुणे किंवा दिल्लीपुरती मर्यादित नसून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात आहे, असे त्यांनी सांगितले. या तरुणांच्या अपेक्षा, स्वप्ने आणि गरजा समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, लहानपणी आई-वडील झोपताना डोक्याला तेल लावण्याचा सल्ला द्यायचे, त्यामुळे बुद्धी तल्लख होते असे सांगायचे. मात्र, “एका माणसाने आयुष्यभर डोक्याला तेल चोपडले, पण बुद्धी आली नाही,” असा टोला त्यांनी लगावला. शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणून काय बोलावे आणि काय करावे याचा विचार झाला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. आधारशी लिंक करण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech