नवी दिल्ली : २६ ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरानंतर आता नेपाळमधील चिलिमे परिसरातील बोगद्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सातत्याने सुरू आहे. भारतीय लष्कराने बोगद्यातील अडथळा निर्माण झालेल्या भागापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. या मोहिमेत भारतीय लष्करासोबत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि सीमा रस्ते संघटना (बीआरओ) यांच्या पथकांचाही सहभाग आहे. बचाव पथक अत्यंत अरुंद मार्गातून बोगद्याच्या आत प्रवेश करून शोधमोहीम राबवत आहे. भारतीय लष्कर आणि नेपाळी लष्कराच्या जवानांसोबत एनडीआरएफ चे पथकही या शोधकार्यात सहभागी झाले आहे. बोगद्याच्या आतील भागातील एंडोस्कोपिक कॅमेऱ्याने टिपलेली पहिली छायाचित्रेही समोर आली आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बोगद्याच्या आतली परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
चिलिमे बोगद्याचा एक भाग ब्लॉक झाल्यामुळे बचाव पथक पर्यायी मार्ग तयार करत आहे. अडथळा निर्माण झालेल्या भागापर्यंत पोहोचणे आणि तेथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार करणे, हा या पथकाचा मुख्य उद्देश आहे. भारतीय लष्कर, एनडीआरएफ आणि बीआरओचे जवान यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. या बचाव मोहिमेत ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स हे देखील घटनास्थळी उपस्थित आहेत. ते बचाव पथकाला तांत्रिक मार्गदर्शन देत असून, बोगद्याच्या आतील परिस्थितीचा अंदाज घेऊन बचावकार्याबाबत आवश्यक सल्ला देत आहेत.
चिलिमे बोगद्यातील बचाव मोहिमेचे नेतृत्व कर्नल परीक्षित मेहरा करत आहेत. यापूर्वी उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगदा दुर्घटनेत ४१ मजुरांच्या यशस्वी बचाव मोहिमेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सिल्क्यारा बोगद्यात १८ दिवस चाललेल्या बचाव मोहिमेनंतर सर्व ४१ मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते. कर्नल मेहरा अरुणाचल प्रदेशातील सेला बोगद्याच्या बांधकामाशीही संबंधित होते. त्यांचा अनुभव लक्षात घेता, नेपाळमधील चिलिमे येथे सुरू असलेल्या बचाव मोहिमेत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सध्या बचाव यंत्रणांचे संपूर्ण लक्ष बोगद्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यावर आहे. या मोहिमेत सहभागी सर्व पथके सातत्याने काम करत असून, पर्यायी मार्गाच्या माध्यमातून शक्य तितक्या लवकर अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.