नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर किंचित वाढून ३.४० टक्के झाला आहे, जो फेब्रुवारी महिन्यात ३.२१ टक्के होता. किरकोळ महागाई दरातील ही वाढ प्रामुख्याने अन्नपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे झाली आहे. तथापि, ही दर अजूनही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या ४ टक्के लक्ष्यापेक्षा कमी आहे. मार्चमध्ये अन्नपदार्थांच्या किमती वाढीचा दर ३.८७ टक्के राहिला, जो मागील महिन्यात फेब्रुवारीमध्ये ३.४७ टक्के होता.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) यांनी सांगितले की, मार्चमध्ये ग्रामीण भागातील किरकोळ महागाई दर ३.६३ टक्के आणि शहरी भागातील किरकोळ महागाई दर ३.११ टक्के राहिला. मार्चमध्ये ग्रामीण भागातील अन्न महागाई दर ३.९६ टक्के राहिला, तर शहरी भागात तो ३.७१ टक्के होता. आकडेवारीनुसार मार्चमध्ये कांदा -२७.७६ टक्के, बटाटा -१८.९८ टक्के, लसूण -१०.१८ टक्के, तूर डाळ -९.५६ टक्के आणि मटर, हरभरा -७.८७ टक्के घसरणीसह राष्ट्रीय स्तरावर सर्वात कमी महागाई नोंदवणाऱ्या शीर्ष पाच प्रमुख वस्तू ठरल्या आहेत. या सर्वांमध्ये महागाई दर वार्षिक आधारावर नकारात्मक राहिला आहे.
दुसरीकडे, मार्चमध्ये चांदीच्या दागिन्यांमध्ये १४८.६१ टक्के, सोने/हिरा/प्लॅटिनम दागिन्यांमध्ये ४५.९२ टक्के, खोबरे ४५.५२ टक्के, टोमॅटो ३५.९९ टक्के आणि फ्लॉवर (फुलकोबी) ३४.११ टक्के अशी वाढ नोंदली गेली असून, राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक महागाई नोंदवणाऱ्या शीर्ष पाच वस्तूंमध्ये यांचा समावेश आहे. या सर्व वस्तूंमध्ये महागाई दर वार्षिक आधारावर सकारात्मक राहिला आहे. याशिवाय, मार्च महिन्यात ज्या पाच राज्यांमध्ये किरकोळ महागाई दर सर्वाधिक राहिला, त्यामध्ये तेलंगणा (५.८३ टक्के), आंध्र प्रदेश (४.०५ टक्के), कर्नाटक (३.९६ टक्के), तामिळनाडू (३.७७ टक्के) आणि राजस्थान (३.६४ टक्के) यांचा समावेश आहे.