पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवर चर्चा

0

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज, मंगळवारी सुमारे ४० मिनिटे दूरध्वनीवर चर्चा झाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामानंतर दोन्ही नेत्यांमध्ये प्रथमच संवाद झाला आहे. यासंदर्भातील माहितीनुसार, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चेचे आयोजन करण्यात आले होते, मात्र या उच्चस्तरीय बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यानंतर ट्रम्प यांनी आज, मंगळवारी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला.पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर (एक्स) या चर्चेची माहिती देताना म्हणाले की, माझे मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला. आम्ही विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला असे त्यांनी सांगितले. तसेच दोन्ही देशांमधील व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पश्चिम आशियातील परिस्थितीवरही चर्चा झाली असून होर्मुज जलडमरूमध्य सुरक्षित आणि खुला ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतामधील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी सांगितले की, भारत-अमेरिका संबंध मजबूत पायावर उभे आहेत. ट्रम्प यांनी मोदींना, “आम्हाला तुमच्याबद्दल खूप प्रेम आहे,” असे म्हंटल्याचे सर्जियो गोर यांनी नमूद केले. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामानंतर ही पहिलीच चर्चा आहे. दोन्ही नेत्यांनी होर्मुज जलडमरूमध्यावरील परिस्थितीवर विशेष लक्ष केंद्रित केले, जो सध्या मध्यपूर्वेतील तणावाचा केंद्रबिंदू ठरला आहे. ट्रम्प यांनी दावा केला की, होर्मुज परिसरात इराणी नौदलाच्या जहाजांवर कारवाई करण्यात आली असून तेथील बारूदी सापळे हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech