सौरभ कटियार यांच्याकडे एमपीएससीच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार

0

मुंबई : पेपरफुटी प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आल्यानंतर सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे देण्यात आला आहे. साधारण वर्षभरापूर्वीच कटियार यांनी एमपीएससीच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. त्यामुळे त्यांना आयोगाच्या कामकाजाचा काही प्रमाणात अनुभव असल्यानेच त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर गेल्याने अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य सदस्याकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरु आहे. लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने न्या. दिलीप भोसले यांची समिती गठीत केली असून त्यांना चौकशीसाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. राज्यपालांच्या मान्यतेनंतर चौकशी समितीची अधिसूचना निर्गमित होणार असून त्यानंतर समितीचे कामकाज सुरू होईल. समितीचा अहवाल आणि त्यावरील सरकारचा निर्णय होण्यास लागणारा कालावधी लक्षात घेऊन भीमनवार यांच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य सदस्याकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, MPSC आयोगाला नवीन सचिव (प्रभारी) लाभले… आता प्रतीक्षा नव्या अध्यक्षांची… दोन महिन्यांनी नवीन अध्यक्ष नक्कीच लाभतील, तेही विद्यार्थ्यांच्या मनातले…!,असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech