नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेल्या काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच प्रियंका गांधी वाड्रा यांच्याविरोधात गुरुवारी दुसरी एफआयआर दाखल करण्यात आली. पोलीस सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे की, राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांशी कथितरीत्या धक्काबुक्की करून सरकारी कर्तव्यात अडथळा आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यापूर्वी बुधवारी या दोन्ही भावंडांविरोधात आकाशवाणीच्या परिसरात जबरदस्तीने प्रवेश करून गोंधळ घातल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांवर हल्ला केल्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवत दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे.पोलीस सूत्रांनुसार, बुधवारी जनपथ आणि जंतर-मंतर परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांच्या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेसच्या इतर अनेक नेते आणि कार्यकर्त्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बुधवारी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी जनपथ येथील एका दक्षिण भारतीय रेस्टॉरंटमध्ये दुपारचे जेवण केल्यानंतर अचानक जंतर-मंतरच्या दिशेने आंदोलन करण्यासाठी मोर्चा काढला. पोलिसांनी विरोधी पक्षांच्या खासदारांच्या बसगाड्या रस्त्यातच अडवल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार वादावादी तसेच धक्काबुक्की झाली.आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा इतर महिला नेत्यांसह हातात संविधानाची प्रत घेऊन रस्त्यावरच झोपल्या. मोठ्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी त्यांना आणि इतर नेत्यांना रस्त्यावरून हटवून ताब्यात घेतले.