सुनसरी आणि सिराहा जिल्ह्यांत अनिश्चितकालीन संचारबंदी
गोरखपूर : क्षुल्लक कारणाहून निर्माण झालेल्या हिंदू-मुस्लीम तणावानंतर नेपाळच्या सुनसरी आणि सिराहा जिल्ह्यात अनिश्चितकालिन संचारबंदी लावण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर नेपाळच्या सीमावर्ती भागात भारताने देखील सुरक्षा व्यवस्था कडेकोट केली आहे. धार्मिक हिंसाचाराचे लोण भारतात पसरू नये याची दक्षता घेतली जातेय. नेपाळच्या दक्षिण भागात सांप्रदायिक तणाव तीव्र झाल्यानंतर सुनसरी आणि सिराहा जिल्ह्यांतील अनेक भागांत प्रशासनाने अनिश्चितकालीन संचारबंदी (कर्फ्यू) लागू केली आहे. गेल्या २६ जुलै रोजी सुनसरी जिल्ह्यातील कप्तानगंज येथे हिंदू-मुस्लीम समुदायांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर परिस्थिती चिघळली. मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्यानिमित्त हिंदू भाविक कोशी बॅरेज येथून पवित्र जल घेऊन जात असताना डीजेवर संगीत वाजवले जात होते. यावर मुस्लिम समुदायातील काही नागरिकांनी आक्षेप घेतल्याने दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. हा वाद पुढे हाणामारीत आणि नंतर हिंसक संघर्षात परिवर्तित झाला.परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन सिराहा जिल्हा प्रशासनाने गुरुवारी दुपारी २ वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत अनेक भागांत संचारबंदी लागू केली आहे. तसेच सुनसरी जिल्ह्यातील इनरुवा, दुहाबी, भोक्राहा आणि देवानगंज या भागांमध्ये यापूर्वी लागू करण्यात आलेली संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, नेपाळी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. बैठकीत देशातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून, सामाजिक सलोखा, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मता कायम राखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा आणि संबंधित घटकांमध्ये समन्वय वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाच्या माहितीनुसार, हिंसाचार इतर भागांत पसरू नये म्हणून सुनसरी आणि सिराहा जिल्ह्यांतील संवेदनशील भागांत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान भारतात या हिंसाचाराचे लोण पसरू नये आणि शांतता कायम रहावी यादृष्टीने कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.