लातूर : एप्रिल महिन्याचा शेवटच्या आठवड्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. पारा ४० अंशांच्या पार गेला असताना, सर्वसामान्य नागरिक घरातून बाहेर पडायला घाबरत आहेत मात्र, अशा भीषण उन्हातही ‘पोटाची खळगी’ भरण्यासाठी मेंढपाळ कुटुंब आपली बाळ-बच्चे आणि मुक्या जनावरांसह एका शेतातून दुसऱ्या शेतात भटकंती करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मेंढपाळांचे आयुष्य हे सततच्या प्रवासाचे. एका ठिकाणचा चारा संपला की दुसऱ्या ठिकाणचा रस्ता धरावा लागतो. या प्रवासात सर्वाधिक हाल होतात ते मेंढ्यांच्या आणि शेळ्यांच्या लहान पिल्लांचे (कोकरांचे). रखरखत्या उन्हात ही कोकरे जास्त वेळ चालू शकत नाहीत, त्यांचे पाय भाजतात. त्यामुळे त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी महिला मेंढपाळ या पिल्लांना बैलगाडीत टाकून प्रवास करीत आहेत.
मेंढपाळ कुटुंबातील महिला केवळ घर सांभाळत नाहीत तर या कठीण प्रवासात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. डोक्यावर ऊन, पायातली चप्पल झिजलेली आणि सोबत लहान मुले, अशा परिस्थितीतही या महिलांची जिद्द थक्क करणारी आहे. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागातील ओढे, नाले आणि विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे या मेंढपाळांना जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि चाऱ्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. अनेक ठिकाणी शेतकरी आपल्या शेतात खत मिळावे म्हणून मेंढपाळांना थांबवून घेतात. मात्र, उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारच्या वेळी या कुटुंबांना झाडांचा आश्रय घेण्यावाचून पर्याय उरत नाही. चारा आणि पाण्याच्या शोधात एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे धाव घ्यावी लागते. निसर्गाचा लहरीपणा आणि वाढत्या उष्णतेने या भटक्या जमातीचे जगणे अधिक कठीण झाले आहे.