नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँगेसचा मोठा पराभव झाला. त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असल्याचे चित्र आहे. अशातच काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना काँग्रेसमध्ये तृणमूल काँगेस विलीन करण्याचा प्रस्ताव ठेवला. या विलीनीकरणाच्या बदल्यात ममता बॅनर्जी यांना काँग्रेसचे ‘राष्ट्रीय उपाध्यक्षपद’ आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांना पक्षाचे ‘महासचिवपद’ देण्याची तयारी सोनिया गांधी यांनी दर्शवली आहे. दरम्यान काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यास ममता बॅनर्जी तयार आहेत. मात्र, तृणमूल नेते अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांच्याकडे काही अटी ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपच्या वाढत्या राजकीय हल्ल्यांचा आणि केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईचा दाखला देत सोनिया गांधी यांनी ममता यांना हा सल्ला दिला आहे. विलीनीकरण न केल्यास भाजप त्यांनाही ‘आम आदमी पार्टी’सारखे (आप) अडचणीत आणू शकते, अशी भीती सोनिया गांधी यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अभिषेक बॅनर्जी यांनी एका बैठकीत राहुल गांधींसोबत या विषयावर चर्चा केली. काँग्रेसमधील विलीनीकरणानंतर ममता बॅनर्जी यांना राज्यसभेवर निवडून द्यावे आणि त्यांना राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद देण्यात यावे, अशी अट ठेवली असल्याची माहिती समोर आली आहे. अभिषेक बॅनर्जी यांनी दिलेल्या प्रस्तावावर काँग्रेस पक्षाची अद्याप प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या ८० पैकी ५८ आमदारांनी आपला वेगळा गट केला आहे. तर, दुसरीकडे २९ पैकी २० खासदारांनी बंड केल्याची चर्चा आहे. बंडखोर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसवरच दावा करण्याची शक्यता आहे. अशातच दिल्लीत मोठी घडामोड झाली.