‘आप’च्या सात खासदारांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग, हरभजन सिंग यांची सुरक्षा बदलल्याने वाद अधिक तीव्र

0

चंदीगड : पंजाबमधील आम आदमी पार्टी (आप) मध्ये निर्माण झालेला अंतर्गत कलह थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पक्षातील सात राज्यसभा खासदारांनी वेगळा मार्ग स्वीकारल्याच्या दाव्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले असून या प्रकरणात आता सुरक्षा आणि सत्ताकेंद्रांमधील संघर्षही उघडपणे दिसू लागला आहे. माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग उर्फ भज्जी यांच्या सुरक्षेचा मुद्दा याच पार्श्वभूमीवर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

पंजाब सरकारने भज्जी यांना देण्यात आलेली वाय श्रेणीची सुरक्षा अचानक मागे घेतली. जालंधर येथील त्यांच्या निवासस्थानी तैनात असलेले पंजाब पोलिसांचे जवान तातडीने परत बोलावण्यात आले. मात्र, या निर्णयानंतर लगेचच केंद्र सरकारने हस्तक्षेप करत त्यांना सीआरपीएफ सुरक्षा उपलब्ध करून दिली. त्यामुळे राज्य आणि केंद्र यांच्यातील राजकीय तणाव उघड झाला आहे. भज्जी यांनी अद्याप अधिकृतपणे आप सोडल्याचे किंवा इतर पक्षात जाण्याचे जाहीर केलेले नसले तरी त्यांच्या हालचालींमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, आपमधून बाहेर पडणाऱ्या गटाचे नेतृत्व केल्याचा दावा करणारे राघव चढ्ढा यांनी सात खासदार आपल्या सोबत असल्याचे सांगितले होते. यापूर्वी त्यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली होती, आणि त्यानंतर त्यांनाही केंद्राकडून संरक्षण देण्यात आले होते. या घडामोडींमुळे आपमध्ये मोठी फूट पडल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा आवाज म्हणजे राज्यसभा खासदार विक्रमजीत साहनी यांचा आहे. त्यांनी दावा केला की आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्याकडे राजीनामा मागितला होता. सुरुवातीला ते तयार झाले होते, मात्र सल्लागारांच्या सूचनेनंतर त्यांनी निर्णय बदलला. साहनी यांनी पंजाबची स्थिती ‘आयसीयू’मध्ये असल्यासारखी असल्याचे सांगत, राज्याला वाचवण्यासाठी केंद्र सरकारच्या मजबूत सहकार्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

दुसरीकडे, आपमध्येच राहणारे काही खासदार या घडामोडींना विरोध करत आहेत. संत सीचेवाल म्हणाले की, राघव चड्ढा यांनी ‘आझाद ग्रुप’ बनवण्याबद्दल बोलून मला १६, १७ आणि १८ एप्रिल रोजी चहासाठी बोलावले होते, पण मी तिथे गेलो नाही. मी त्यांना कोणत्याही प्रकारचा ‘आझाद ग्रुप’ बनवण्यास किंवा त्यात सामील होण्यास नकार दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षात राहूनच पंजाबसाठी काम करणे हेच योग्य आहे.

या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी सोशल मीडियावर सात खासदारांवर उपरोधिक टीका करत राजकीय वातावरण अधिकच तापवले. याचबरोबर, त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्याची वेळ मागितली असून पक्ष बदलणाऱ्या खासदारांवर ‘राईट टू रिकॉल’ची कारवाई करण्याची मागणी करण्याची तयारी दर्शवली आहे.

या सगळ्या घडामोडींमध्ये आपच्या कार्यकर्त्यांचा रोषही उघड झाला आहे. जालंधर, लुधियाना आणि फगवाडा येथे पक्ष सोडणाऱ्या खासदारांच्या घराबाहेर निदर्शने करण्यात आली. काही ठिकाणी ‘गद्दार’ असे लिहून संताप व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे, या निदर्शनांदरम्यान पोलिसांची उपस्थिती असूनही मोठी कारवाई झाल्याचे दिसून आले नाही.

राजकीय पातळीवर या बंडाचा परिणाम सोशल मीडियावरही दिसून आला आहे. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चढ्ढा यांच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये सुमारे १४ लाखांची घट झाल्याचे समोर आले आहे. तज्ञांच्या मते, ही तरुण मतदारांची प्रतिक्रिया असू शकते. सध्या आपमधील या मोठ्या फाटाफुटीमुळे पंजाब आणि राष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी नवे वळण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech