नवी दिल्ली : जेट इंजिनवर चालणाऱ्या ड्रोन ‘दिव्यास्त्र एमके-3’ने यशस्वी उड्डाण केले आहे. कावा यूएव्ही प्रायव्हेट लिमिटेड (हॉवरइट) या कंपनीने ‘दिव्यास्त्र एमके-3’ची यशस्वी चाचणी घेतली. कंपनीच्या माहितीनुसार, हे भारतातच विकसित करण्यात आलेले पुढच्या पिढीतील ड्रोन आहे. कंपनीने सांगितले की, ‘दिव्यास्त्र एमके-3’ जेट इंजिनच्या मदतीने चालते. निश्चित लक्ष्यावर अचूक हल्ला करण्याच्या उद्देशाने हे ड्रोन विकसित करण्यात आले आहे. या ड्रोनची संपूर्ण तंत्रज्ञान प्रणाली भारतातच विकसित करण्यात आली आहे.
कंपनीच्या सहसंस्थापकांनी सांगितले की, ही केवळ चाचणीची उड्डाणे नाहीत, तर भारताच्या क्षमतेचे प्रदर्शन करणारी घोषणा आहे. भारताने मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने हे सिद्ध केले आहे की, देशांतर्गतच जेट इंजिनवर चालणारी अचूक हल्ला करणारी प्रणाली विकसित करून ती प्रत्यक्ष उडवण्याची क्षमता भारताकडे आहे. ‘दिव्यास्त्र एमके-3’ हे ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पना प्रत्यक्षात साकारत असल्याचे उदाहरण आहे.