पश्चिम बंगाल : सुवेंदू अधिकारींच्या ‘पीए’ची हत्या

0

मध्यमग्राम येथे अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराने उग्र रूप धारण केले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदु अधिकारी यांचे खासगी सहायक (पीए) चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम येथे आपल्या कारने प्रवास करणाऱ्या चंद्रनाथ रथ यांच्यावर दुचाकीस्वार अज्ञात हल्ले खोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.

यासंदर्भातील माहितीनुसार, चंद्रनाथ रथ आपल्या कारने प्रवास करत होते. नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून आलेल्या ३ हल्लेखोरांनी दोहारिया परिसरात त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. संधी साधून त्यांनी गाडीला वेढा घातला आणि जवळून अनेक गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.या हल्ल्यात रथ यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी बुद्धदेव बेरा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.चंद्रनाथ रथ हे मूळचे पूर्व मेदिनीपूर येथील रहिवासी होते आणि भाजपाच्या धोरणात्मक वर्तुळात त्यांची ओळख होती. पक्षाच्या सूत्रांनुसार, भवानीपूर विधानसभा निवडणुकीदरम्यान ते सुवेंदु अधिकारी यांच्या टीममधील एक महत्त्वाचे सदस्य होते.

या घटनेनंतर बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपाने याला “राजकीय हत्या” असे संबोधत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाभोवती नाकाबंदी केली असली तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. रात्री घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे प्रशासनाच्या सुरक्षेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech