ठाणे : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) चा पेपर ठाण्यात फुटल्याचे (लीक) उघडकीस आले आहे, त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून उद्या (२८ जून) होणारी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तातडीने रद्द केली आहे. टीईटी परीक्षेच्या नव्या तारखेसह इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परिषदेकडून कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा आणि पात्रता परीक्षांच्या पेपरफुटीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. नीट परीक्षेचा पेपर याआधी फुटला होता. यामध्ये एकूण 13 जणांना अटक करण्यात आली होती 9 महाराष्ट्रातून आरोपी अटक केले होते. या सगळ्याला महिनाही उलटत नाही तोपर्यंत टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती मिळाली आहे. उद्या (रविवारी) होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यभरातील १,०२८ केंद्रांवर टीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी यंदा 4 लाख 28 हजार 122 परीक्षार्थी बसले होते. यामध्ये पुण्यातून सर्वाधिक 45 हजार 562 परीक्षार्थी आहेत. दरम्यान, नीट परीक्षेनंतर पुन्हा एकदा महत्वाच्या परीक्षेचा पेपर फुटल्यानं अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटी परीक्षा सुरक्षित व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तथापि, दि. २७ जून २०२६ रोजी पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भिवंडी येथे काही व्यक्तींना टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून तपासणी केली. या प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी बोलावून पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान संबंधित व्यक्तींकडे आढळलेल्या काही प्रश्न आणि शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) जून २०२६ च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ताब्यात घेतलेले हे लोक नेमके कोण आहेत? त्यांच्याकडे हा गोपनीय पेपर कसा आणि कुठून आला? यात मोठ्या कोचिंग इन्स्टिट्यूट चालवणाऱ्या लोकांचा किंवा शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचा हात आहे का? या सर्व बाजूंचा तपास पोलीस करत आहेत. सध्या त्यांची नावे गुप्त ठेवण्यात आली असून, सखोल चौकशीनंतर या रॅकेटचा मुख्य सुत्रधार समोर येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.