कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने जलदगतीने कार्यवाही करावी : ठाणे महापौर

0

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत कायमस्वरूपी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक, पदोन्नती, वेतन, निवृत्तीवेतन, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, आश्वासित प्रगती योजना, ग्रॅज्युइटी, वैद्यकीय सुविधा तसेच विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करुन कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना महापौरांनी प्रशासनास दिल्या.

महापौरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची भेट घेवून महापालिकेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदने सादर केली होती. या सर्व निवेदनावर प्रशासनासह चर्चा करण्यासाठी कै. अरविंद पेंडसे सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, मनिष जोशी, मधुकर बोडकरे यांच्यासह आस्थापना विभागाचे कर्मचारी तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, रिक्त पदे भरणे, लिपिक व टंकलेखक पदांवरील पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन, सातवा वेतन आयोग, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत देयके, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन तसेच विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी निवेदन सादर केले होते, त्या कर्मचाऱ्यांना समक्ष बोलवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रशासनाने संबंधित विषयांचा सकारात्मक दृष्टीकोनातून अभ्यास करून कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापौरांनी प्रशासनाला सर्व विषयांचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले असून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासन संवेदनशीलपणे काम करेल, असे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. यावेळी श्रमिक जनता संघ, म्युनिसिपल लेबर युनियन, कामगार एकजूट संघटना, टी.एम.टी एम्पलॉईज युनियन, ठाणे महानगरपालिका प्राथमिक श‍िक्षक सेना, महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघ, ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech