नवव्या पिढीकडून आंग्रे घराण्याचा शस्त्रपूजन वारसा पुढे

0

रायगड :  मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या घराण्यातील साडेतीनशे वर्षांहून अधिक काळाची विजयादशमी आणि शस्त्रपूजनाची परंपरा आजही जपली जात आहे. कान्होजीराजे आंग्रे यांच्या नवव्या पिढीतील वंशज सरखेल रघुजीराजे आंग्रे यांनी घेरिया येथील निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन केले. सायंकाळी सीमोल्लंघन आणि सोने लुटण्याचा कार्यक्रमही पार पडला. या वेळी रघुजीराजे आंग्रे यांच्या पत्नी, चिरंजीव आर्यमान व जयार्जुन आणि कन्या गायत्री उपस्थित होते. शस्त्रपूजनात कान्होजीराजे आंग्रे यांच्या वापरातील धोप, तलवारी, दांडपट्टे, गुर्ज, कट्यारी, भाले, जांबिये, परशू, गुप्त्या आणि ढाली यांसारख्या ऐतिहासिक शस्त्रांचा समावेश होता. व्यायामासाठी वापरल्या जाणाऱ्या मुद्गलांसह परवाना प्राप्त आधुनिक अग्निशस्त्रांचेही पूजन करण्यात आले.

कान्होजीराजे आंग्रे यांच्या युद्धातील वापरातील ‘तोफ’ नावाची तलवार विशेष आकर्षण ठरते. दमास्कस पोलादापासून बनविलेल्या या तलवारीचे वजन सुमारे पाच किलो ३०० ग्रॅम असून, लांबी ४० इंच असल्याचे सांगितले जाते. सोन्याची मूठ असलेल्या औपचारिक तलवारीचाही या परंपरेत समावेश आहे. सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्यासह सेखोजी, संभाजी आणि तुळाजी आंग्रे यांनी मराठा आरमाराच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. विजयादशमीला शस्त्रपूजन करण्याची परंपरा या ऐतिहासिक शौर्याची आठवण करून देते. पूर्वजांचा पराक्रम, मराठा आरमाराचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही परंपरा जतन करत असल्याचे रघुजीराजे आंग्रे यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech