विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांचे सक्त निर्देश…
(अनंत नलावडे)
मुंबई : मुंबईतील बहुप्रतिक्षित मनोरा आमदार निवास पुनर्बांधणी प्रकल्पाच्या कामाला वेग देण्यात आले असले तरी येत्या १० जानेवारी २०२८ पर्यंत याचे बांधकाम पूर्ण झालेच पाहिजे असा दम भरत त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे सक्त निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी येथे दिले. प्रा.राम शिंदे यांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कंत्राटदार कंपनीच्या अभियंत्यांसोबत विधानभवनातील आपल्या दालनात यासंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक घेत प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी प्रकल्पातील पूर्ण झालेल्या आणि प्रलंबित कामांचा अहवाल सादर करण्यात आला.
मुंबईच्या वास्तुवैभवात भर घालणाऱ्या या प्रकल्पांतर्गत दोन आधुनिक आणि भव्य इमारती उभारण्यात येत आहेत.नव्या आमदार निवासामध्ये प्रत्येक आमदारासाठी सुमारे १,००० चौरस फूट क्षेत्रफळाचे स्वतंत्र व सुसज्ज निवासस्थान उपलब्ध होणार आहे.तसेच मिनी थिएटर, अत्याधुनिक जिम्नॅशियम, उपहारगृहे आणि इतर आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्रा. शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, २४ मार्च २०२६ रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रकल्पाच्या वाढीव खर्चासह मुंबई महानगरपालिकेच्या ५५ कोटी ५० लाख रुपयांच्या विकास शुल्कास मंजुरी देण्यात आली होती.त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला अधिक गती मिळाली, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
या आढावा बैठकीस विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, शिवदर्शन साठ्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके, कार्यकारी अभियंता विद्याधर पाटसकर, अधीक्षक आमदार निवास रेशमा चव्हाण तसेच कंत्राटदार कंपनीचे वरिष्ठ अभियंते उपस्थित होते. प्रकल्पातील सर्व कामे निर्धारित वेळेत आणि उच्च दर्जाने पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच प्रा.शिंदे यांनी हा प्रकल्प राज्यातील लोकप्रतिनिधींसाठी आदर्श निवास संकुल ठरेल, असा ठाम विश्वासही व्यक्त केला.