खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला परराष्ट्र राज्यमंत्री आणि बिहारचे राज्यपाल राहणार उपस्थित

0

नवी दिल्ली : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या राजकीय अंत्यसंस्कार सोहळ्यात भारतही सहभागी होणार आहे. इराणी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्यात भारत सरकारचे प्रतिनिधित्व बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा करणार आहेत. इराणी सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही खामेनेई यांच्या राजकीय अंत्यसंस्कार आणि दफनविधीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर भारताने या उच्चस्तरीय शिष्टमंडळाला इराणमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या खामेनेई यांच्या स्मरणार्थ ४ ते ९ जुलैदरम्यान आठवडाभर राजकीय शोक आणि अंत्यसंस्कार सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. इराणी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ४ आणि ५ जुलै रोजी खामेनेई यांचे पार्थिव तेहरानमधील ग्रँड मोसल्ला संकुलात जनतेच्या अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच ४ ते ९ जुलैदरम्यान इराणमधील विविध शहरांमध्ये होणाऱ्या अंत्यसंस्कार कार्यक्रमांमध्ये जगभरातील अनेक मान्यवर आणि लाखो नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे.

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. त्यांची राजकीय अंत्ययात्रा ६ जुलै रोजी काढण्यात येणार असून, अधिकृत शोककाळात तेहरान प्रांतात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech