वॉशिंग्टन : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे तणाव सतत वाढत आहे. इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या रशिया दौऱ्यामुळे डोनाल्ड ट्रम्प अधिकच संतप्त झाल्याचे दिसत आहे. त्यांनी धमकी देत म्हटले आहे की, जर पुढील तीन दिवसांत इराणने करार केला नाही, तर त्याच्या तेल वाहिन्यांमध्ये भीषण स्फोट होतील. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, इराण तेल निर्यात करण्याच्या स्थितीतच राहणार नाही. त्यांनी म्हटले की, नाकेबंदीमुळे इराणला जहाजांद्वारे तेल निर्यात करता येत नाही आणि पाइपलाइन उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याची निर्यात पूर्णपणे बंद होईल.
ट्रम्प यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा अमेरिका इराणवर समुद्री आणि आर्थिक दबाव सातत्याने वाढवत आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की, व्हाइट हाऊस डिनरदरम्यान झालेल्या गोळीबारासारख्या घटना देखील त्यांच्या भूमिकेत बदल घडवू शकत नाहीत. ट्रम्प म्हणाले की, “यामुळे मला इराणविरोधातील युद्ध जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.” न्यूज एजन्सीनुसार, अराघची यांनी पाकिस्तानमार्फत अमेरिकेला लेखी संदेश पाठवले आहेत, ज्यामध्ये अणु प्रश्न आणि होर्मुझ सामुद्रधुनीसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे.
इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना लेखी प्रस्ताव पाठवला होता, जो त्यांनी तत्काळ फेटाळला. ट्रम्प यांनी दावा केला की, पहिला प्रस्ताव नाकारल्यानंतर इराणने दुसरा प्रस्ताव पाठवला असून तो अधिक चांगला आहे. ते म्हणाले की, चर्चेसाठी ये-जा करण्यात खूप वेळ जातो आणि आता सर्व चर्चा फोनवरच होतील. इराणला हवे तेव्हा ते त्यांना फोन करू शकतात. दुसरीकडे, इराणने म्हटले आहे की, पुढील चर्चा आता मॉस्कोमध्ये होतील.
दरम्यान इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची पाकिस्तानहून पुन्हा रशियात पोहोचले असून, ते आता राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करणार आहेत. रशियन माध्यमांनी याला दुजोरा दिला आहे. अब्बास अराघची ज्या मेराज एअरलाइनच्या विशेष विमानाने रशियात पोहोचले, त्या विमानावर “मिनाब 168” असे लिहिले होते. हे नाव अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ देण्यात आल्याचे सांगितले जाते. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची राजनैतिक दौऱ्यावर आहेत. ओमानच्या दौऱ्यानंतर ते पुन्हा इस्लामाबादला परतले आणि तेथून आता रशियात गेले आहेत, जिथे त्यांची राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी भेट होण्याची शक्यता आहे.