गुजरात एटीएसची मोठी कारवाई; देशविरोधी कट रचणारे दोन तरुण अटकेत

0

गांधीनगर : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई करत देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दोन तरुणांना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी भारतात हल्ले करणे, शस्त्रे आणि निधी जमा करणे तसेच देशाविरुद्ध युद्ध छेडण्याचा कट रचत होते. उपपोलीस अधीक्षक वीरजीतसिंह परमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तपासात समोर आले की, हे दोन्ही युवक गेल्या सात महिन्यांपासून व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर सक्रिय होते. ते १२ ते १३ सदस्यांच्या अतिशय जवळच्या गटाचा भाग होते. हा गट भारतात “गझवा-ए-हिंद” स्थापन करण्याबाबत चर्चा करत होता. हे युवक इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील आयएसआयएससारख्या अतिरेकी आणि कट्टरपंथी संघटनांच्या विचारसरणीने प्रभावित झाले होते. पोलिस तपासानुसार, या दोघांना कोणत्याही हँडलरकडून मार्गदर्शन मिळत नव्हते, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पूर्णपणे “स्वयं-कट्टरपंथी” बनले होते.

गुजरात एटीएसने अटक केलेल्या दोन आरोपींची नावे इरफान खान पठाण आणि मुर्शिद जाहिद अख्तर शेख अशी आहेत. इरफान हा २२ वर्षांचा असून तो पाटण जिल्ह्यातील सिद्धपूर येथील रहिवासी आहे. त्याने मेहसाणा येथून एमएससी केमिस्ट्रीचे शिक्षण घेतले असून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता.दुसरा आरोपी मुर्शिद जाहिद अख्तर शेख हा २१ वर्षांचा असून तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे. त्याने आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. मुर्शिद मुंबईत आपल्या भावासोबत बिर्याणीच्या दुकानात काम करत होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech