परभणी : राज्यातील खासदार हे कुठल्याही विकासाचा निधी कमी पडत असल्याने गेले नाही. मिळालेला निधी देखील खर्च करू शकत नसल्याचे चित्र आहे. जनतेचे काम न करणाऱ्या खासदारांनी आज गद्दारी करीत खाजगी निधीसाठी पक्षांतर केल्याचा आरोप उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोजित पत्रकार परिषद मध्ये केला. राज्यामध्ये ऑपरेशन टायगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सहा खासदार फुटून शिंदे शिवसेनेत गेले आहेत. या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख ठाकरे यांनी दौरा काढला आहे. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक खासदाराचा हजेरीपट आमच्याकडे आहे. मतदारसंघाच्या कामासाठी किती वेळा ते मंत्र्यांकडे गेले, व स्वतःच्या कामासाठी किती वेळा गेले हा सगळा आढावा आमच्याकडे आहे. आता यानंतर गद्दारीच्या मुळावर घाव घालण्याचे काम केले जाणार आहे. गद्दारी करणाऱ्या खासदारांना मतदार नक्कीच धडा शिकवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यात अस्थिरता वाढली असून पेपर फुटी प्रकरण महाराष्ट्रातच घडत असल्याचे उदाहरण त्यांनी दिले. आम्ही सत्तेत असल्यावर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली ते कर्जमाफी देतात. माफी गुन्हेगारांचा दिली जाते आम्ही शेतकऱ्यांच्या ऋणात कायम आहोत. शेतकऱ्यांसाठी आणखी चांगले निर्णय घेण्यापूर्वीच सरकार पाडले व शेतकऱ्यांना आज वाऱ्यावर सोडण्याचे काम महायुती करत आहे. महायुतीकडून राज्यात फक्त जातिवाद वाढवून सत्ता चालवणे एवढेच काम चालू असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाविकास आघाडीत एकमत नसल्याबद्दल विचारले असता त्यांनी वरिष्ठ पातळीवर एकमत असून स्थानिक पातळीवर मात्र एकवाक्यता नसल्यामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. यावर नक्कीच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. परभणीच्या खासदारांना जनताच उत्तर देईल. मी परभणीकरांनी महापौर बसविल्याबद्दल त्यांचे आभार व आणखी एका खासदाराने गद्दारी केल्याबद्दल क्षमा मागण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी खा. अनिल देसाई खा. अरविंद सावंत खा. संजय राऊत, आ. अंबादास दानवे, माजी खा. चंद्रकांत खैरे, महापौर सय्यद इकबाल व इतर प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.