महाराष्ट्र संतांची भूमी, वारकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही – एकनाथ शिंदे

0

ठाणे : वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात संतापाची लाट उसळली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांना थेट इशारा दिला आहे. विकास लवांडे यांनी हिंदुत्ववादी कीर्तनकारबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत शिंदे संतापून म्हणाले, “महाराष्ट्र ही साधू-संतांची, वारकऱ्यांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. या पवित्र भूमीत वारकरी संप्रदायाला ‘घुसखोर’ म्हणणे हा केवळ अपमान नाही, तर संपूर्ण संत परंपरेवर घाला आहे!” आणि त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो.

“वारकरी संप्रदायाच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. महाराष्ट्रात कोणालाही वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत होणार नाही,” असा इशारा देताना शिंदेंनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.” शिंदेंनी पुढे जोरदार हल्ला चढवत म्हटले, “अशा लांड्या-लबाड्या महाराष्ट्रात चालणार नाहीत. वारकऱ्यांचा, संतांचा किंवा महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही.”

वारकरी संप्रदाय हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या समतेच्या आणि पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेणारा आहे. हा संप्रदाय कीर्तन-प्रवचनातून समाजप्रबोधनाचे महान कार्य करतो. अशा पवित्र परंपरेवर टीका करणे हे अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी असल्याचेही त्यांनी ठणकावले. “महाराष्ट्र ही पुरोगामी विचारांची भूमी आहे. येथे संतांचा आणि वारकऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. भविष्यात अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची हिंमत कुणी करू नये,” असा कडक इशारा देत शिंदेंनी लवांडे यांना थेट लक्ष्य केले. या भूमिकेमुळे राज्यातील वारकरी संप्रदायाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech