सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दर वाढून ११.३९ टक्क्यांवर

0

खाद्यपदार्थ, उत्पादित वस्तू, इंधन आणि विजेच्या किमती वाढल्याने महागाईत वाढ

नवी दिल्ली : महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना धक्का देणारी बातमी आहे. किरकोळ महागाई दरानंतर आता खाद्यपदार्थ, उत्पादित वस्तू तसेच इंधन आणि विजेच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दर वाढून ११.३९ टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑगस्टमध्ये हा दर ९.९२ टक्के होता. गेल्या पाच महिन्यांतील हा सर्वोच्च स्तर आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने बुधवारी घाऊक मूल्य निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित घाऊक महागाई दराची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांचा महागाई दर ऑगस्टमधील ७.०५ टक्क्यांवरून वाढून सप्टेंबरमध्ये ८.६६ टक्के झाला. उत्पादित वस्तूंचा घाऊक मूल्य निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित महागाई दरही वाढून ९.७६ टक्क्यांच्या मालिकेतील सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे. ऑगस्टमध्ये हा दर ८.३७ टक्के होता. इंधन आणि विजेचा महागाई दर सप्टेंबरमध्ये २५.८५ टक्के नोंदवण्यात आला, तर ऑगस्टमध्ये तो २२.९३ टक्के होता.

मंत्रालयाने डब्ल्यूपीआयची आकडेवारी जाहीर करताना सांगितले की, खनिज तेल (पेट्रोलियम उत्पादनांसह), खाद्यपदार्थ, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू, कोळसा आणि लिग्नाइट, मूलभूत धातू, रसायने आणि रासायनिक उत्पादने, वस्त्रोद्योगातील उत्पादने, रबर आणि प्लास्टिक उत्पादने तसेच विद्युत उपकरणांच्या किमती वाढल्यामुळे सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दरात वाढ नोंदवण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या मौद्रिक धोरण समितीने गेल्याच आठवड्यात धोरणात्मक रेपो दरात ०.२५ टक्क्यांची वाढ करून तो ५.५० टक्के केला होता. त्याचवेळी, या आठवड्याच्या सुरुवातीला जाहीर झालेला किरकोळ महागाई दरही खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये वाढून २३ महिन्यांच्या उच्चांकी ५.५४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech