नवी दिल्ली : दिल्ली येथे आयोजित ब्रिक्स परिषद २०२६ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासोबतच जगात ग्लोबल साऊथची भूमिका अधिक मजबूत करण्यावर भर दिला. ते म्हणाले की, जगात अतिशय वेगाने बदल होत आहेत आणि कोणतीही शक्ती कायमस्वरूपी प्रभावशाली राहू शकत नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ब्रिक्स बैठकीचे यजमानपद भूषवल्याबद्दल भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. ते म्हणाले की, आज जगात मोठे आणि ऐतिहासिक बदल घडत आहेत. अशा परिस्थितीत विकसनशील देशांची एकजूट आणि त्यांचा वाढता प्रभाव जगाला बहुध्रुवीय बनवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
शी जिनपिंग यांनी सध्याच्या जागतिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “सध्याचे जागतिक वातावरण अत्यंत अस्थिर असून, त्यात अनेक प्रकारची जोखीम आणि आव्हाने आहेत. अशा वेळी ब्रिक्स देशांची जबाबदारी आहे की त्यांनी पुढाकार घेऊन नेतृत्व करावे, विकसनशील देशांना एकत्र आणावे आणि जगात शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी सकारात्मक शक्ती म्हणून काम करावे.” आंतरराष्ट्रीय नियम आणि समानतेवर भर देताना शी जिनपिंग म्हणाले की, नियम नसलेले जग हे वाहतूक सिग्नल नसलेल्या चौकासारखे आहे, जिथे केवळ अराजकता आणि गोंधळ निर्माण होईल. न्याय आणि निष्पक्षता ही प्रत्येक देशाची इच्छा आहे. त्यामुळे जगाचे नियम एखाद्या एका शक्तिशाली देशाने नव्हे, तर सर्व देशांनी मिळून ठरवले पाहिजेत.
ताकदीच्या जोरावर आपले म्हणणे इतरांवर लादण्याची जुनी पद्धत आता चालता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. विकसनशील देशांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय नियमांचे संरक्षण केले पाहिजे. यामध्ये प्रत्येक देशाच्या सार्वभौमत्वाचा आदर करणे, एकमेकांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे आणि वादांचे शांततापूर्ण मार्गाने निराकरण करणे यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय कायदे सर्व देशांना समानपणे लागू झाले पाहिजेत आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुहेरी निकष असता कामा नयेत, असेही त्यांनी सांगितले.
शी जिनपिंग म्हणाले की, जगातील प्रत्येक देश मग तो छोटा असो वा मोठा, श्रीमंत असो वा गरीब—प्रत्येक देश सन्मानास पात्र आहे. विकसनशील देशांनी बहुपक्षीयतेला आणि संयुक्त राष्ट्रांच्या भूमिकेला अधिक बळ दिले पाहिजे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये सर्व देशांचा समान सहभाग सुनिश्चित करता येईल.
जागतिक व्यापार संघटनेत (WTO) योग्य दिशेने सुधारणा करण्याची, निष्पक्ष व्यापार नियमांना प्रोत्साहन देण्याची आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेला (NDB) पाठिंबा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेत सुधारणा करून विकसनशील देशांचा आवाज आणि प्रतिनिधित्व अधिक मजबूत केले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.शी जिनपिंग म्हणाले की, कोणतेही मोठे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वप्रथम लोकांच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे. विकसनशील देशांनी २०३० च्या शाश्वत विकास उद्दिष्टांची (SDGs) पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
चीनचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, चीनने आपल्या ‘ग्लोबल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह’ अंतर्गत आतापर्यंत १२० हून अधिक देशांमध्ये २,००० पेक्षा जास्त प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि २ लाखांहून अधिक लोकांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच चीनने ज्या ५३ आफ्रिकी देशांशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आहेत, त्यांच्यासाठी शून्य शुल्काच्या व्यापाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी समस्यांच्या मूळ कारणांवर उपाय करण्याचा सल्ला शी जिनपिंग यांनी दिला. ते म्हणाले की, देशांनी एकत्र येऊन पारंपरिक तसेच अपारंपरिक सुरक्षेच्या धोक्यांचा सामना केला पाहिजे आणि पॅरिस हवामान कराराची पूर्णपणे अंमलबजावणी केली पाहिजे.कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बाबत बोलताना त्यांनी सांगितले की, एआयचा विकास मानवकल्याण आणि सर्वांच्या हितासाठी झाला पाहिजे. यासाठी जागतिक पातळीवर एकमताने नियम तयार करण्याची गरज आहे, जेणेकरून नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्व देशांना समानपणे मिळू शकेल.