विद्यार्थी आंदोलन : राहुल आणि प्रियंकांनी घेतली जखमी विद्यार्थ्यांची भेट

0

नवी दिल्ली : कॉक्रेच जनता पार्टीच्या संसदेवरील मोर्चातील हिंसक झटापट आणि लाठीचार्जच्या घटनेनंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालय आणि लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनीही आरएमएल रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या खासदारांनी मंगळवारी लोक कल्याण मार्गाकडे मोर्चा काढत आंदोलन केले. या आंदोलनात प्रियंका वाड्रा, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली आणि विद्यार्थी आंदोलनावरील पोलिस कारवाईचा निषेध केला. आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचे खासदार के. सुरेश, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर जबाबदारी टाळण्याचा सरकारचा प्रयत्न असून, या विषयावर संसदेत चर्चा होऊ नये, अशी सरकारची भूमिका असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी केली. तसेच, या विषयावर संसदेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी विरोधकांची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यापूर्वी राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी आरएमएल रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. काँग्रेसच्या माहितीनुसार, त्यांनी गंभीर जखमी झालेल्या एका विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचीही भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

काँग्रेसने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांची मागणी परीक्षा-संबंधित वादांबाबत जबाबदारी निश्चित करणे आणि सरकारने योग्य ती कारवाई करावी, अशी आहे. दुसरीकडे, विरोधकांनी लोकसभा अध्यक्षांकडे या विषयावर संसदेत चर्चा घडवून आणण्याचा पुनरोच्चार केलाय. प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असून, विरोधक सरकारकडे उत्तरदायित्व आणि संसदेत चर्चेची मागणी करत आहेत. तर प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यावर भर दिला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech